Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 4 March 2008

रसविंदाच्या शवविच्छेदन
अहवालाबाबत डॉक्टरांची गुप्तता

मडगाव, दि. ३ (प्रतिनिधी)ः शनिवारी येथील हॉस्पिसियो इस्पितळात शस्त्रक्रिया करताना मरण आलेल्या आगोंद - काणकोण येथील रसविंदा पागी या चार वर्षीय बालिकेचे शवविच्छेदन आज गोमेकॉतील तीन डॉक्टरांनी केले. पण, आपला निष्कर्ष राखून ठेवला असून रासायनिक पृथक्करणासाठी हैद्राबाद येथील कॅथॉलॅडीक प्रयोगशाळेत अवशेष पाठवले आहेत.
येथील पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांनी केलेल्या विनंतीनुसार गोमेकॉच्या डिननी या शवविच्छेदनासाठी डॉ. अविनाश पुजारी, डॉ. ई. जे. रॉड्रीगीस व डॉ. आर. जी. विल्सन पिंटो यांची नियुक्ती केली व त्यांनीच आज शवविच्छेदन केले. मिळालेल्या माहितीनुसार विच्छेदन अहवाल जरी गुप्त ठेवलेला असला तरी शस्त्रक्रियेसाठी दिलेल्या गुंगीचा डोस जास्त होऊन त्यांतच तिचा मृत्यू ओढवला जाण्याची शक्यता व्यक्त केल्याचे कळते. पण, दुदैवी रसविंदाचा मृत्यू नेमका कशामुळे ओढवला त्याचा उलगडा होण्यासाठी आता हैद्राबादहून सदर अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
रसिंदाला ओटी पोटात दुखू लागल्याने प्रथम काणकोण सरकारी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. पण तेथून तिला हॉस्पिसियोत पाठवले गेले व तेथील तपासणीत तिच्या ओटीपोटाच्या भागात गळू आढळून आला व तो काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रियेची तयारी केली असता त्या पूर्वीच हा प्रकार घडला.

No comments: