आके चोरी प्रकरण
-------------------
मडगाव, दि. ५ (प्रतिनिधी)ः दोन दिवसांपूर्वी आके येथे झालेल्या साडेचार लाखांच्या धाडसी चोरीतील तिघा आरोपींना वास्को पोलिसांनी अटक केली असून सव्वाचार लाखांचा चोरीचा माल हस्तगत केला आहे. जप्त मालात ऍल्युमिनियम व पितळी चिपांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पकडलेल्यांत वास्को येथील सतीश संपत इंगळे व जमील इसाक कालेगर यांचा समावेश आहे. आके येथील शिवलाल रतंगूर यांचा गोदाम असून त्यात भंगारमालापासून तयार केलेल्या ऍल्युमिनियम व पितळी चिपा ठेवल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी ही चोरी झाली. गोदाम फोडून आरोपींनी १४० चिपा नेल्या होत्या. सदर आरोपी व्यापारी असून रतंगूर याने त्यांच्यावरच संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी आज वास्को येथे छापा टाकून तिघांनाही ताब्यात घेतले व चिपा हस्तगत केल्या.
गेल्या वर्षीही असाच एक गोदाम आके येथे फोडून अशाच प्रकारे चिपांची चोरी झाली होती . त्या प्रकरणातही हेच आरोपी आहेत की काय याचा शोधही पोलिसांनी सुरू केला आहे. गोदाम फोडून चोरी होण्याचा प्रकार घडूनही गोदाम मालक गप्प कां राहिला याचेही पोलिसांना कोडे पडलेले आहे. या चिपांशी भंगारवाल्यांचा संबंध आहे की काय ,चोरीच्या मालापासूनच त्या बनविल्ल्या आहेत की काय अशा अनेक दृष्टिकोनातून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चालविल्याचे पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखालीच ही कारवाई केली गेली.
Thursday, 6 March 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment