पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)ः नागालॅण्ड विधानसभा निवडणूक प्रचारात सक्रिय होऊन तेथील युवकांना गोव्यात नोकऱ्या देण्याचे आश्वासन देत असल्याचा आरोप राज्यपाल एस. सी. जमीर यांच्यावर होत आहे. यासंदर्भात पत्रकारांनी आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना विचारले असता ते काही क्षण निःशब्दच झाले.
श्री. जमीर यांच्यावरील आरोपांबाबत काय बोलावे नि काय बोलू नये, अशा द्विधा मनःस्थितीत सापडलेल्या मुख्यमंत्र्यांनी अखेर या वृत्ताची विश्वासार्हता पडताळून पाहावी लागेल, असे सांगून वेळ मारून नेली. तसेच हा त्यांच्या बदनामीसाठी विरोधकांनी मांडलेला डाव असण्याची शक्यता वर्तवली.
निवडणूक काळात अशाप्रकारचे आरोप - प्रत्यारोप होतच असतात. मडगाव मतदारसंघात विरोधकांनी आपल्यावरही अनेक बालंट आणण्याचे प्रयत्न केल्याची आठवण त्यांनी करून दिली. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या प्रचाराची दिशा बदलण्यासाठी अशा क्लृप्त्या आखल्या जातात, असेही त्यांनी सांगितले.
दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले श्री. जमीर यांचे नागालॅण्डप्रेम अजूनही कमी झालेले नाही. गोव्याच्या राज्यपालपदी असूनही त्यांच्या नागालॅण्ड वाऱ्या व तेथील राजकारणातील हस्तक्षेप याबाबत यापूर्वीच विरोधकांकडून टीका झाली आहे. कॉंग्रेसकडून सत्ता हस्तगत केलेल्या नागालॅण्ड पीपल्स फ्रंटला आव्हान देण्यासाठी जमीर यांची मदत कॉंग्रेसला हवी असल्यानेच त्यांची ही नाटके केंद्राकडून मुकाट्याने सहन केली जात आहेत. राज्यपाल सारख्या उच्च पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशाप्रकारे प्रत्यक्ष निवडणुकीत प्रचारासाठी उतरणे ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी असून या पदाची प्रतिष्ठाच धुळीला मिळाल्याचे नागालॅण्ड पीपल्स फ्रंटचे म्हणणे आहे.
राज्यपाल जमीर यांच्याविरोधात राज्यात भाजपकडून सध्या राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. यावेळी त्यांच्या नागालॅण्ड दौऱ्यावर होणाऱ्या खर्चाचा समावेश असून आता जमीर हे तिथे आपला मुलगा व भावासाठी प्रचारात उतरल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने भाजपच्या टीकेची धार अधिक तीव्र होणार आहे.
Wednesday, 5 March 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment