पर्यटकांवरील सुरीहल्ला प्रकरण दडपले?
पणजी, दि. 2 (प्रतिनिधी) ः राज्यात विदेशी पर्यटकांवर बलात्कार होण्याच्या घटना घडत असतानाच आता चक्क तारांकीत हॉटेलात वास्तव्य केलेल्या देशी पर्यटकांवर चाकू हल्ला करून त्यांना लुटण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणाचा त्वरीत पाठपुरावा करण्याऐवजी पोलिसांकडूनच हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याने, राज्यात पर्यटकांच्या सुरक्षेबाबत भलेमोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काल रात्री पर्वरी येथील एका हॉटेलमध्ये झारखंडमधून मधुचंद्रासाठी गोव्यात आलेल्या नव दांपत्याच्या आयुष्यात भयानक प्रकार घडला. या घटनेने हादरलेल्या त्या नव दांपत्याने जीव मुठीत घेऊन ताबडतोब आज दुपारी 1.30 वा. विमान पकडून मुंबई गाठली. यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता, आम्हांला ती भयाण रात्र यानंतर कधीही आठवायची नाही आणि दर महिन्याला गोव्यात येणे जमणार नसल्याने पोलिस तक्रारही करायची नाही, असे सांगून दूरध्वनी ठेवून दिला. मधुचंद्रासाठी गोव्यात आलेल्या त्या दांपत्यांच्या आयुष्यात त्या रात्री त्या हॉटेलात असे काय घडले होते, याची माहिती काढण्यासाठी त्यांच्या गोव्यातील एका मित्राकडे संपर्क साधला असता, धक्कादायक माहिती समोर आली.
गोव्यात आलेल्या या नव दांपत्याचे काही दिवसापूर्वीच लग्न झाले होते. गोव्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटन स्थळ म्हणून नाव मिळाल्याने त्यांनी मधुचंद्रासाठी गोव्याची निवड केली. त्यानुसार एका ट्रॅव्हल एजन्सी मार्फत त्यांनी गोवा गाठले. त्याच एजन्सीने त्यांना कळंगुटला जाणाऱ्या रस्त्यावरील पर्वरी येथील एका हॉटेलात खोली मिळवून दिली. काल दिवसभर फिरून ते खोलीवर गेले असता, मध्यरात्री खोलीत कोणीतरी फिरत असल्याची चाहूल त्या तरुणाला लागल्याने त्याने उठून दिवा लावला. तर आतून कडी असलेल्या त्या खोलीत एका व्यक्तीला पाहून तो पूर्णपणे भांबावून गेला. त्या व्यक्तीने सरळ त्याच्या पोटात आणि जांघेत चाकू खुपसून पलंगावर झोपलेल्या त्याच्या पत्नीचे सर्व दागिने घेऊन पोबारा केला. पोटात चाकू खुपसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात तेथेच कोसळला. यावेळी त्याच्या पत्नीने बाजूच्या खोलीत झोपलेल्या अन्य लोकांना उठवण्याचा प्रयत्न केला. कोणीही उठले नाही, म्हणून ती "रिसेप्शन'कडे गेली. यावेळी तेथे कोणीही नव्हते. यावेळी तिने जोरजोरात ओरडायला सुरुवात केल्याने रस्त्यावर फेऱ्या मारणारा सुरक्षा रक्षक धावून आला. त्यानंतर या घटनेची माहिती पर्वरी पोलिसांना देण्यात आली. तसेच त्यांनी झारखंडला दूरध्वनी करून गोव्यातील एका ओळखीच्या व्यक्तीशी संपर्क साधला. यावेळी त्या व्यक्तीने त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल केले. तेथील खाजगी वॉर्डात तात्पुरता उपचार घेऊन त्या दांपत्याने आज दुपारी मुंबई गाठली. यावेळी त्यांची जबानी घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी "तुम्ही तक्रार नोंद केल्यास तुम्हांला पुन्हा पुन्हा गोव्यात यावे लागणार' असल्याचे सांगून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तक्रार करण्याच्या मनस्थितीत नसलेल्या या दांपत्याला पोलिसांनी एवडे गर्भगळीत केले की, भिक नको पण, कुत्रा आवर अशी त्यांची स्थिती झाली.
त्यामुळे आम्हांला तक्रार दाखल करायची नाही, असे त्यांच्याकडून पोलिसांनी वदवून घेतल्याचे सांगण्यात आले. पोलिस डायरीत या प्रकरणाची नोंद झाली नसली तरी, अशा प्रकरची घटना गोव्यात घडणे, ही चिंतेची बाब बनली आहे. त्या हॉटेलच्या बंद खोलीत ती व्यक्ती आतमध्ये कशी पोचली, रात्री त्या रिसेप्शनवर कोणीही का नव्हते, पोलिस स्थानकात नोंद न झालेले असे प्रकार यापूर्वी किती घडले आहेत, हा संशोधनाचा विषय झाला आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास पर्यटकांमध्ये गोव्याची चुकीची प्रतिमा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
Monday, 3 March 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment