Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 5 March 2008

मांडवी पूलही असुरक्षित

सरकारच्या निष्क्रियतेचा आणखी एक नमुना
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)ः मांडवी नदीतून खनिज वाहतूक करणाऱ्या बार्जचे धक्के बसून मांडवी पूल दिवसेंदिवस असुरक्षित बनत आहे. मात्र, सरकार दरबारी पुलाच्या धोक्याची तपासणी करण्यासाठी आवश्यक यंत्रणाच उपलब्ध नाही. यामुळे आता जुवारी पाठोपाठ मांडवी पुलाच्या सुरक्षेबाबतीतही सरकारचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.
गेल्या २६ एप्रिल ०६ व १६ जानेवारी ०७ रोजी खनिज वाहतूक करणाऱ्या बार्जचा धक्का मांडवी पुलाला लागल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम खात्याकडे नोंद करण्यात आली आहे. यातील १६ जानेवारी रोजी लागलेल्या धक्क्याची तीव्रता जास्त होती. यामुळे या धक्क्याचा पंचनामा करून सदर बार्जमालकाकडून ४ लाख रुपये नुकसानभरपाई वसूल केल्याची माहिती मिळाली. परंतु, आश्चर्य म्हणजे हे अपघात होऊन दोन वर्षे उलटली तरी अद्याप सदर खांबची दुरुस्ती सोडाच, पण पाहणीही करण्याची तसदी संबंधित खात्याने घेतलेली नाही.
या प्रकरणी सहाय्यक अभियंते श्री. बालकृष्णन यांना विचारले असता, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुलाच्या खांबची पाहणी करण्याची यंत्रणा सा. बां. खात्याकडे नसल्याचे सांगितले. राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेकडून पुलाच्या या खांबची पाहणी करून सर्वेक्षण करण्यासाठी तसेच पाण्याखालची "व्हीडीओग्राफी" करण्यासाठी एक प्रस्ताव २ जानेवारी ०८ रोजी वित्त खात्याकडे पाठवण्यात आला होता. तो प्रस्ताव तब्बल दोन महिन्यांनी संमत करण्यात आला. येत्या १५ मार्चपासून प्रत्यक्ष या कामाला सुरुवात केली जाणार असून सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च केला जाणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, कामाला विलंबाबाबत विचारल्यास दुरुस्ती कामाची प्रक्रिया करण्यांतच वेळ जात असल्याचे कारण त्यांनी पुढे केले.
मांडवी नदीतून दररोज शेकडो खनिज वाहतूक करणाऱ्या बार्जचे वारंवार धक्के लागून दोन्ही पुलांच्या खांबांना धोका निर्माण झाला आहे. यावर नजर ठेवण्यासाठी सरकारकडे कोणतीही कायमस्वरूपी यंत्रणा नसल्याचे स्पष्ट झाल्याने हा उघडपणे लोकांच्या जिवाशी चाललेला खेळ असल्याचे स्पष्ट आहे. सा. बां. खात्याच्या राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत पुलाच्या देखरेखीचे काम हाती घेण्यात येते. जलवाहतुकीचा धोका पुलाला पोहोचू नये, याची जबाबदारी सागरी पोलिसांची असल्याचे मत श्री. बालकृष्णन यांनी व्यक्त केले. सागरी पोलिसांचे मात्र या प्रकाराकडे अजिबात लक्ष नसल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारचा मोठा अपघात घडला तरच त्याची माहिती सागरी पोलिसांना मिळते, अन्यथा दिवसाकाठी या खांबांना धक्का देऊन जाणाऱ्या बार्जचा थांगपत्ता लागत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, याप्रकरणी बार्जवर काम करणाऱ्या एका कामगाराकडून मिळवलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी या खांबांना दिवे असले तरी पाण्याचा प्रवाह व भरतीओहोटी यामुळे बार्जचा तोल जाऊन धक्के लागणे हा नियमितचा प्रकार असल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, जुन्या मांडवी पुलाच्या खांब क्रमांक ७, ८, ९ व नव्या पुलाच्या खांब क्रमांक १२, १३, १४ यांच्या खालून जलवाहतुकीची सोय करण्यात आली आहे. या खांबांना बार्जच्या धक्क्यामुळे नुकसान पोहोचू नये, यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

No comments: