पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)ः बंडखोर गटाबरोबर झालेल्या चर्चेवेळी समन्वय समितीने काढलेल्या "फॉर्म्यूल्या" ची अंमलबजावणी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी झाली नाही तर राष्ट्रवादीचे नेते मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सरकारला बाहेरून पाठिंबा देतील असा इशारा राष्ट्रवादीकडून दिल्लीतील कॉंग्रेस श्रेष्ठींना दिल्याची खात्रीलायक माहिती खास सूत्रांनी दिली आहे.
गोव्यातील विद्यमान आघाडी सरकारच्या समन्वय समितीने मान्य केलेला तोडगा अजूनही अमलात आणला जात नसल्याने पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी आज दिल्लीत बराच थयथयाट केल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केल्याचे कळते. श्री.पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या या बैठकीवेळी राष्ट्रवादीचे नेते तथा केंद्रीय विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल, सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल व संरक्षणमंत्री ए. के. ऍन्थनी हजर होते,अशीही माहिती मिळाली आहे. शरद पवार यांनी यावेळी कॉंग्रेस श्रेष्ठींना ताबडतोब समन्वय समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची विनंती केली. सत्ता टिकवायची असेल तर काही गोष्टींकडे तडजोड करणे भाग असल्याचे त्यांनी सांगितले. मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांचा मंत्रिमंडळातील समावेश, राष्ट्रवादीचे नेते जुझे फिलिप डिसोझा यांना सार्वजनिक बांधकाम खाते देणे व दयानंद नार्वेकर यांच्याकडील वित्तखाते मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात द्यावे, अशा तीन प्रमुख मागण्या या गटाने केल्याची खबर आहे. दरम्यान, या बैठकीसंदर्भात काल मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना विचारले असता त्यांनी अशा बैठकांकडे आपण लक्ष देत नसल्याचे सांगितले. अशा बैठका कितीही झाल्या तरी त्यामुळे आपल्यावर काहीही परिणाम होणार नसल्याचे ते म्हणाले.
Thursday, 6 March 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment