बालिकेच्या मृत्यूचे गूढ आज उकलणार ?
आज गोमेकॉत शवचिकित्सा
मडगाव,दि. 2 (प्रतिनिधी) ः काल येथील हॉस्पिसियू इस्पितळात शस्त्रक्रिया टेबलावरच मरण आलेल्या आगोंद- काणकोण येथील रसविंदा पागी या चार वर्षें वयाच्या बालिकेचे शवविच्छेदन आज रविवार असल्याने होऊ शकले नाही , ते उद्या होणार असून त्या नंतरच तिच्या मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होणार आहे.
हॉस्पिसियोतील डॉक्टरी निष्काळजीपणामुळे या बालिकेला अकाली मृत्यू आल्याचा दावा जरी तिच्या कुटुंबीयांनी केलेला असला व इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुआंडो डिसा यांनी गुंगीच्या जादा प्रभावामुळे तिचा मृत्यू ओढवण्याची शक्यता व्यक्त केलेली असली तरी उद्याच्या शवचिकित्सेनंतरच या प्रकरणी खरे कारण उघड होणार आहे.
काल सायंकाळी या प्रकारानंतर हॉस्पिसियोत एकच हलकल्लोळ उडाला व त्यानंतर व्यवस्थापनाने पोलिसांना कळविले व तो नैसर्गिक मृत्यू असल्याने शवचिकित्सेची विनंती केली. मडगाव पोलिसांनीही प्रकरणाला फाटे फुटू नयेत या कारणास्तव गोमेकॉ डीनांशी संपर्क साधून डॉक्टरांच्या पथकाव्दारा शवचिकित्सा केली जावी अशी विनंती केली आहे. पोटात दुखत असल्याच्या कारणावरून रसविंदाला प्रथम काणकोण आरोग्य केंद्रात दाखल केले होते व तेथून तिला हॉस्पिसियोत हलविण्यात आले होते. तेथे तपासणी करून काल तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले व त्यानुसार सर्व तयारी करून व गुंगी देऊन सकाळीच तिला शस्त्रक्रिया टेबलावरही नेण्यात आले होते व तेथेच ती अत्यवस्थ झाली , त्यातून तिला वाचविण्यासाठी डॉक्टरांच्या पथकाने केलेली प्रयत्नांची शिकस्त वाया गेली व अखेर दुपारी 2 वा. तिला मृत घोषित करण्यात आले.
तिला नेमके कोणते दुखणे होते, कोणती शस्त्रक्रिया केली जाणार होती , याबाबत हॉस्पिसियोत कोणीही काहीही सांगायला तयार नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार ओटीपोटाच्या भागात निर्माण झालेला गळू काढून टाकण्यासाठी ही शस्त्रक्रिया होती. काल या प्रकारानंतर काल डॉ. रुआंडो व प्रभारी अधीक्षक डॉ. कुमारी नास्नोडकर यांनी लगोलग हॉस्पिसियोत येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आजही तेथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या . या प्रकारामुळे हॉस्पिसियोतील वातावरणात गंभीरपणा आल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान चिमुकल्या रसविंदाच्या आकस्मिक मृत्यूमुळे तिच्या आगोंद -काणकोण येथील कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिची 29 वर्षीय आई सुनिता या घटनेने संपूर्णपणे कोलमडून पडली आहे तर 72 वर्षीय आजोबा शंभू तिचा मृत्यू झाल्याचे खरे मानायलाच तयार नाहीत. काल पोलिसांनी या सर्वांची निवेदने नोंदवून घेतली, तो एकंदर प्रसंगच मन हेलावणारा होता. रसविंदाचे वडील विदेशात असतात.
हॉस्पिसियोतील गत वर्षभरातील अशा प्रकारचा हा चौथा मृत्यू मानला जातो. गतवर्षी राय येथील साप चावलेल्या एका मुलाचा तेथे डॉक्टरी हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला होता तर एका महिलेला अशीच गुंगी लावलेल्या ठिकाणीच मृत्यू आला होता. महिनाभरापूर्वी दोन छोट्या मुलांचे प्राणवायूवर ठेवलेल्या ठिकाणी निधन झाले होते.
Monday, 3 March 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment