Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 4 March 2008

नव्या धनादेशांमुळे बॅंकांसह ग्राहकांची तारांबळ

एमआरसीआर क्लिअरिंगचा घोळ
------------------
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)ः भारतीय स्टेट बॅंकेने ग्राहकांच्या सोयीसाठी १ फेब्रुवारीपासून सुरू केलेल्या "एमआयसीआर क्लिअरिंग' या धनादेश वटवण्याच्या नव्या पद्धतीमुळे आणि जुन्या पद्धतीतील तांत्रिक अडचणींमुळे सध्या बॅंकांसह ग्राहकांनाही धावपळ करावी लागत आहे. विविध वित्तीय संस्था तथा खाजगी बॅंकांनी कर्ज घेतलेल्या आपल्या ग्राहकांना येत्या १ एप्रिलपूर्वी नवे धनादेश जमा करण्याचा फतवा काढला आहे. यामुळे ग्राहकांची बरीच तारांबळ उडाली आहे.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशांनुसार भारतीय स्टेट बॅंकेने पूर्वीची अखिल गोवा "क्लिअरिंग' पद्धत रद्दबातल ठरवून १ फेब्रुवारीपासून "मॅग्नेटिक इंक कॅरक्टर रिकॉग्निशन" ही नवी संगणकीय "क्लिअरिंग' पद्धत अमलात आणली. धनादेशावरील छापील कोड क्रमांकाच्या साहाय्याने धनादेशांची विभागणी करून ते वटवण्याची ही अनोखी पद्धत आहे. काही बॅंकांनी यापूर्वी ग्राहकांना वितरित केलेले धनादेश जुने असल्याने त्याचा वापर संगणकीय क्लिअरिंगसाठी होऊ शकत नाही. परिणामी, असे धनादेश "युनीफाईड क्लिअरिंग' च्या नावाखाली स्टेट बॅंकेच्या कोषागार (ट्रेजरी) शाखेतून वठवले जातात. परंतु ही सोय फक्त मार्चपर्यंतच आहे. १ एप्रिलपासून ग्राहकांनी आपले जुने धनादेश जमा करून नवे धनादेश नेण्याची गरज आहे. आता कर्जासाठी ग्राहकांनी विविध ठिकाणी "पोस्टडेटेड" धनादेश जमा केल्याने ते बदलण्यासाठी एका महिन्याची मुदत आहे. अन्यथा त्यांचे जुने धनादेश बॅंक खात्यातून वटणार नसल्याने त्यांना दंड सोसावा लागणार आहे.
एकट्या "जीई कन्ट्रीव्हाइड" या वित्त कंपनीकडे गोव्यात एकूण ७ हजार ग्राहक आहेत. यातील बहुतेक ग्राहकांचे धनादेश बदलावे लागणार असल्याची माहिती या कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिली. मुख्य म्हणजे या वित्तीय कंपनीकडून काहीही लेखी पत्र ग्राहकांना पाठवण्यात आलेले नाही. केवळ दूरध्वनीवरून संदेश देण्यात येत असल्याने तो संदेश प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचेलच याची शाश्वती नसल्याने येत्या काळात मोठा गोंधळ निर्माण होणार आहे. कर्जाचे पैसे नेहमी खात्यात जमा करूनही बॅंकेचे वसुली अधिकारी जेव्हा ग्राहकांना सतावण्यास सुरुवात करतील, तेव्हाच कुठे सरकारी यंत्रणा जागी होईल. विविध व्यापारी व बॅंक संघटनांनी याबाबत वेळीच निर्णय घेण्याची आवश्यकता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, या नव्या पद्धतीनुसार राज्यातील चार "क्लिअरिंग" केंद्रांचे पणजी मध्यवर्ती केंद्रात स्थलांतर करण्यात आले आहे. म्हापसा, मडगाव, वास्को व फोंडा येथील धनादेश पणजी येथे पाठवले जातात. पणजी स्टेट बॅंकेत हे धनादेश संध्याकाळी ४ वाजता पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता स्टेट बॅंकेतून आणावे लागतात. त्यानंतर त्यांची शाखांवार विभागणी करून ते कुरिअर सेवेव्दारे पुन्हा वरील चार ठिकाणी पाठवले जातात. तिथून ते वठल्यानंतर पुन्हा पणजी येथे पाठवले जातात व त्यानंतर अखेर ते स्टेट बॅंकेत जमा होतात. या नव्या पद्धतीमुळे सर्व बॅंकांना आपल्या नियमित कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत बदल करणे भाग पडले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांस सकाळी ७ वाजता कामावर येऊन संध्याकाळी उशिरापर्यंत काम करावे लागणार आहे, अशीही माहिती मिळाली आहे.
यापूर्वी ग्रामीण भागांतील काही शाखांत देण्यात आलेले धनादेश क्लिअरिंग पद्धतीने त्याच दिवशी वटवणे शक्य होते. परंतु आता या पद्धतीमुळे अशा शाखांना आपले धनादेश टपालसेवेच्या साहाय्याने पाठवणे भाग पडल्याने त्यासाठी किमान पाच ते सहा दिवस विलंब होतो. गोवा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये झालेल्या बैठकीत या पद्धतीला विरोध करण्यात आला असला तरी आता याबाबत काही ठोस निर्णय घेणे भाग पडणार आहे.
---------------------------------------

No comments: