पणजी, दि. १६ (विशेष प्रतिनिधी): उत्तर गोव्यातील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दयानंद नार्वेकर यांचे मंत्रिपद गेल्यापासून ते पक्षात उपेक्षित ठरले आहेत. पक्ष संघटनेतही कोणतेच पद त्यांच्याजवळ नाही. त्यामुळे ते अस्वस्थ असून, गोवा डेमोक्रेटीक पार्टी हा पर्यायी पक्ष त्यांच्या प्रेरणेनेच कार्यरत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. नार्वेकरांना शह देणारे आणि मागून येऊन तिखट झालेले अन्य नेते केवळ पैशांच्या जोरावर पक्षाला आपल्या तालावर नाचवित आहेत, असे चित्र स्पष्ट दिसत असल्याने नार्वेकर नव्या पक्षाच्या आधारे उत्तर गोव्यात आपला जम बसविण्याचा प्रयत्नांत असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. पर्वरी येथे नव्या पक्षाच्या बैठकीला त्यांनी केलेले मार्गदर्शन सूचक मानले जाते. वाळपईचे आमदार विश्वजित राणे यांनी उत्तर गोव्यात कॉंग्रेसची सूत्रे आपल्या हाती घेण्यासाठी डावपेच आखायला सुरवात केली असून, याकामी त्यांना खाशांच्या अनुभवांची मदत मिळत आहे. काही वर्षांपूर्वी प्रतापसिंग राणेंमुळे आपले मुख्यमंत्रिपद हुकल्याची खंत नार्वेकर यांना आहेच, त्यात आता त्यांचा पुत्रही आपल्या उरावर बसण्यास सज्ज झाल्याने ते अस्वस्थ असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. म्हापसा येथील जिल्हा इस्पितळाच्या खाजगीकरणाविरोधात नार्वेकर यांनी आवाज उठविला आहे. विश्वजित यांना शह देण्याचा हा एक प्रयत्न असून, बार्देशमधील अनेक पंचायतींनी त्यांना समर्थन दिले आहे. उत्तर गोवा कॉंग्रेस अध्यक्षपद आपले कार्यकर्ते अमरनाथ पणजीकर यांना मिळवून दिल्याने त्यांची या जिल्ह्यात पक्षातील शक्ती यापूर्वीच सिद्ध झाली आहे.
मिकींना मंत्रिपद देण्याच्या विरोधात काही मंत्र्यांसह कॉंग्रेस आमदारांनी आपला गट निर्माण केला असला तरी त्यात नार्वेकर नसून, त्यांची सहानुभूती मिकी यांनाच आहे. मिकींविरुद्ध कुंभाड रचणारे अद्याप त्यांच्याविरोधात खटला दाखल करू शकलेले नाहीत, याकडे त्यांनी एका वृत्तवाहिनीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लक्ष वेधले. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी योग्यवेळी त्यांच्या ‘त्यागा’ची (खळखळ न करता मंत्रिपद सोडल्याची)दखल घेण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यांची गत सध्या पांडुरंग मडकईकर यांच्याप्रमाणेच झाली आहे. त्यामुळे यापुढे आश्वासनांवर विसंबून न राहाता आपला सवतासुभा उभा करायचा त्यांचा मानस असल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्वरी येथे प्रा. एडवर्ड डिलीमा या त्यांच्या कडव्या समर्थकाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेला गोवा डेमोक्रॅटीक पक्ष हा त्यांचाच पक्ष असल्याचे मानले जाते. कॉंग्रेसने आपली उपेक्षा चालूच ठेवली तर पक्षांतर करण्यासही ते मागेपुढे पाहाणार नाहीत, असे त्यांच्या निकटच्या एका संरपचांने सांगितले. पैशांच्या राजकारणावर त्यांनी अनेकवेळा केलेली टीका लक्षात घेता, नवा पक्ष काढून त्यात पैसे गुंतवण्याऐवजी ते दुसरा पर्याय निवडतील, असा राजकीय निरीक्षकांचा कयास आहे.
Monday, 17 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment