सावंतवाडी, दि. १५ (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग पोलिसांनी सावंतवाडी दोडामार्ग रस्त्यावरील सासोली घाटीत (ता. दोडामार्ग) काल पकडलेल्या स्ङ्गोटकांच्या साठ्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या अनिल धोपेश्वरकर व प्रेमलाला छन्ना या दोन्ही संशयितांना १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. हा साठा गोव्यात वाळपई येथे नेमका कोणत्या स्टोन क्रशरवर नेण्यात येत होता याचा तपास सिंधुदुर्ग पोलिस करणार आहेत. या दोन्ही संशयितांना घेऊन याठिकाणी भेट देणार असल्याची माहिती दोडामार्गचे निरीक्षक अविनाश काळदाते यांनी दिली.
दरम्यान, काल पकडण्यात आलेल्या या संशयितांनी हा साठा गोव्यातील एका मंत्र्याच्या क्रशरवर नेण्यात येत होता, असे प्राथमिक चौकशीत सांगितल्याची चर्चा असली तरी त्याबाबत काहीही अधिकृतपणे सांगण्यास दोडामार्ग पोलिसांनी नकार दिला. या प्रकरणी माहिती उघड केल्यास चौकशीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता वर्तवून तपासाअंतीच माहिती उघड करू,असेही पोलिसांनी सांगितले.
काल पकडण्यात आलेल्या या स्फोटकांत १५०० डिटोनेटर, जिलेटिनच्या प्रत्येकी ५०० किलोच्या १५ पिशव्या, अमोनिअम नायट्रेट आदी मालाचा समावेश होता. मुळात हा साठा ज्या पद्धतीने नेला जात होता तो प्रकार अत्यंत धोकादायक ठरू शकला असता. या स्फोटकांचा स्फोट झाला असता तर संपूर्ण तालुका बेचिराख करण्याइतकी त्यांची क्षमता होती, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
Sunday, 16 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment