Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 20 January 2011

मणिपूरमधील नक्षलवाद्यांना कासावलीत अटक


मणिपूर पोलिसांची गोवा पोलिसांसोबत खास मोहीम


वास्को, दि. १९ (प्रतिनिधी)
गेल्या चार महिन्यांपासून कासावली, बाजारवाडो येथील भर लोकवस्तीत असलेल्या इमारतीत तळ ठोकून असलेल्या मणिपूर येथील चार नक्षलवाद्यांना एका खास मोहिमेद्वारे आज अटक करण्यात आली. मणिपूरमध्ये अनेक भयंकर गुन्ह्यांत सहभाग असलेले सदर नक्षलवादी ‘पीपल्स युनायटेड लिबरेशन फ्रंट’ (पुल्फा) ह्या खतरनाक संघटनेचे सदस्य असून अटक करण्यात आलेल्यांत तीन पुरुष व एक महिलेचाही समावेश आहे. सदर महिला ‘पुल्फा’ संघटनेचा प्रमुख एम. आय. खान याची पत्नी असल्याचे तपासात उघड झाले आहे.
आज दुपारी दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक ऍलन डीसा, वास्को उपअधीक्षक महेश गावकर तसेच अन्य पोलिस अधिकार्‍यांच्या मदतीने मणिपूर येथील पोलिसांनी एका खास ऑपरेशनद्वारे कासावली, बाजारवाडो येथील ‘सेक्रामेन्त हॉल’ या इमारतीतून या चार नक्षलवाद्यांना ताब्यात घेऊन नंतर अटक केली. मणिपूरमधील थोबल जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक ऍलन डीसा यांना सदर नक्षल्यांविषयी माहिती दिली होती. त्यानंतर आज मणिपूर पोलिस दलाचे अधिकारी गोव्यात दाखल झाल्यानंतर दुपारपर्यंत सदर मोहीम राबवून समीर खान (१९), एम. डी नूरसाफीर (३२), अयकपम मणिराम सिंग (३५) आणि समसात सौदा (३५) यांना ताब्यात घेण्यात आले. समसात सौदा ही ‘पुल्फा’चा प्रमुख एम. आय. खान याची पत्नी असून त्याला काही महिन्यांपूर्वी अटक केल्यानंतर संघटनेची सर्व सूत्रे तीच सांभाळत होती, अशी माहिती देण्यात आली.
खून, सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ला, खंडणी वसुली, स्फोटकांचा साठा करणे असे अनेक भयंकर गुन्हे नावावर नोंद असलेले सदर नक्षलवादी गेल्या ऑक्टोबरपासून गोव्यात असलेल्या आपल्या आठ कुटुंबीयांसह राहत असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. गोवा पोलिस, मणिपूर पोलिस, बेळगावस्थित मराठा रेजीमचे अधिकारी व अन्य सुरक्षा यंत्रणांच्या साह्याने ही मोहीम राबवण्यात आली असून जेरबंद नक्षलवाद्यांकडून सात मोबाईल, एक लॅपटॉप व त्यांचा गुन्ह्यांतील सहभाग स्पष्ट करणारी काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. हे नक्षलवादी ज्योकिम फर्नांडिस यांच्या मालकीच्या जागेत भाड्याने राहत असल्याने त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक महेश गावकर यांनी सांगितले.
दरम्यान, आज दुपारी सदर नक्षल्यांची वेर्णा पोलिस स्थानकात मणिपूर व गोवा पोलिस यांच्याकडून कसून चौकशी सुरू असल्याचे चित्र दिसत होते. त्यानंतर संध्याकाळी उशिरा त्यांना वास्कोच्या प्रथम श्रेणी न्यायालयात सादर करण्यात आले. सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर त्यांना मणिपूर येथे नेण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. ते आपल्या ज्या आठ कुटुंबीयांकडे राहत होते त्यांचीही रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती असे समजते.
दरम्यान, सदर खतरनाक नक्षलवादी गोव्यात गेले चार महिने तळ ठोकून असल्याने आणि याची खबरबातही गोवा पोलिसांना नसल्याने येथे उलटसुलट चर्चा सुरू होती. राज्यातील सुरक्षा यंत्रणेचा फोलपणा उघड झाल्याने येथील नागरिकांनी भीतीची भावनाही व्यक्त केली आहे.

No comments: