Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 21 January 2011

रवींच्या गृहमंत्रिपदावर संक्रांत?

कॉंग्रेस श्रेष्ठींचा हिरवा कंदील; ड्रग प्रकरण भोवणार
- आज निर्णय शक्य
- हरिप्रसाद गोव्यात

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): पोलिस व ड्रग माफियांचे साटेलोटे व त्यात गृहमंत्री रवी नाईक यांच्या पुत्र रॉय याचे चर्चेत असलेले नाव यामुळे राज्यात तसेच राष्ट्रीय पातळीवरही कॉंग्रेस पक्ष अडचणीत येण्याची दाट शक्यता ओळखून कॉंग्रेस श्रेष्ठींनी रवी नाईक यांच्याकडील गृह खाते काढून घेण्यास हिरवा कंदील दाखवला असल्याची खात्रीलायक खबर मिळाली आहे. पक्षाचे प्रभारी तथा राष्ट्रीय सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद हे आज रात्री गोव्यात दाखल झाले. या निर्णयाबाबत ते कॉंग्रेस विधिमंडळ गटसदस्य तथा पक्ष पदाधिकार्‍यांची मते अजमावून घेणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.
माविन गुदिन्हो आक्रमक
आज कॉंग्रेस विधिमंडळ गटाच्या बैठकीत उपसभापती माविन गुदिन्हो यांनी गृह खात्याच्या कारभारावर सटकून टीका करताना रवी नाईक यांच्याकडून हे खाते काढून घेण्याची जोरदार मागणी केली. या बैठकीला उपस्थित अन्य सदस्यांनी माविन यांच्या या मागणीला थेट पाठिंबा देण्याचे जरी टाळले तरी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असल्याचाच त्यांचा सूर होता. या विषयावरून ही बैठक बरीच वादळी ठरली व अनेकांनी बैठक सोडून जाणे पसंत केले. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावले व तसे काहीच झाले नाही, असा पवित्रा घेतला.
पोलिस, ड्रग माफिया व राजकारणी असे त्रिकोणी साटेलोटे प्रकरण सध्या बरेच गाजते आहे. या प्रकरणी एकामागोमाग एक पोलिस अधिकारी निलंबित होत असल्याने गोव्याची राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पातळीवरही बरीच बदनामी झाली आहे. ‘इंडिया टुडे’ साप्ताहिकाने तर यासंबंधी ‘कव्हरस्टोरी’ प्रसिद्ध करून या संपूर्ण प्रकरणावर झगझगीत प्रकाश टाकल्याने त्याची गंभीर दखल राष्ट्रीय स्तरावरील कॉंग्रेसने घेतली आहे. गत विधानसभा अधिवेशनात भाजपने या विषयावरून सभागृह डोक्यावर घेतले होते. विरोधकांचा तो सूर यंदाच्या हिवाळी अधिवेशनातही कायम राहणार हे ओळखून कॉंग्रेसने वेळीच सावध पवित्रा घेण्याचे ठरवले आहे. आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही रवी नाईक यांच्याकडून गृह खाते काढून घेण्याची मागणी लावून धरल्याने कॉंग्रेससमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
दरम्यान, कॉंग्रेस विधिमंडळ गटाच्या अनेक सदस्यांचेही या विषयी एकमत बनले आहे. बी. के. हरिप्रसाद यांनी दिल्लीत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी या विषयावर सखोल चर्चा केली. गृह खाते तूर्त मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्याकडेच ठेवावे, असाही यावेळी निर्णय झाल्याची खबर आहे. हे खाते रवी नाईक यांच्याकडून काढून घेण्याअगोदर त्यांना हे पद सोडण्याची संधी दिली जाईल, अशीही माहिती खास सूत्रांकडून मिळते.
बैठकीचे आमंत्रण पोलिसांकरवी कसे?
कॉंग्रेस विधिमंडळ गटाच्या बैठकीचे आमंत्रण पोलिसांमार्फत देण्याची एक नवी प्रथा सुरू झाली असून याबाबत हळदोण्याचे आमदार तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. दयानंद नार्वेकर यांनी तीव्र हरकत घेतली आहे. आपण गेले वर्षभर या बैठकीवर बहिष्कार घातला असल्याचे सांगून या बैठकीसाठी कोणतीही प्रक्रिया अवलंबिली जात नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. विधिमंडळ गटाच्या बैठकीत घेण्यात येणार्‍या ठरावांच्या प्रती आमदारांना दिल्या जात नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. याप्रकरणी आपण खुद्द कॉंग्रेसचे प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांच्याकडेही तक्रार केल्याचे ते म्हणाले. सरकारच्या एकूण कारभाराबाबतच नाराजी व्यक्त करून ही परिस्थिती वेळीच सुधारली नाही तर त्याचा जबर फटका कॉंग्रेस पक्षाला बसेल, अशी भीतीही ऍड. नार्वेकर यांनी व्यक्त केली.

No comments: