पणजी, दि. २० (प्रतिनिधी): शिरोडा मतदारसंघातील पंचवाडी या निसर्गसंपन्न गावात एका खाजगी खाण कंपनीला खनिज वाहतुकीसाठी रस्ता तयार करून देण्याचे सरकारचे कारस्थान उघड झाल्याने या विषयी जाब विचारण्यासाठी पंचवाडी बचाव समिती उद्या २१ रोजी सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या आल्तीनो येथील सरकारी बंगल्यावर धडक देणार आहे.
या रस्त्यासाठीची निविदा अलीकडेच सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुळात या रस्त्यामुळे पंचवाडी गावच उध्वस्त होणार असल्याने प्रसंगी जीव गेला तरी बेहत्तर पण हा रस्ता होऊ देणार नाही, असा निर्णायक पवित्राच समितीने घेतला आहे. पंचवाडी गावातील शेती, बागायती व खारफुटी नष्ट करून एका खाण कंपनीसाठी रस्ता तयार करण्याचा घाट सरकारने घातला आहे. या नियोजित प्रकल्पाविरोधात पंचवाडीवासीयांनी दंड थोपटून आत्तापर्यंत हा प्रकल्प रोखून धरण्यात यश मिळवले आहे. ‘सीआरझेड-२०११’ च्या अधिसूचनेप्रमाणे हा रस्ता तयार करण्यास अनेक अडचणी येत असल्या तरी या कायद्याला फाटा देऊन हा रस्ता तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव सक्रिय बनले आहेत, अशी टीका समितीचे निमंत्रक क्रिस्टो डिकॉस्ता यांनी केली.शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांनी याप्रकरणी समितीला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. आमदार महादेव नाईक हे देखील उद्या समितीबरोबर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून या प्रकल्पाला तीव्र विरोध केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पर्रीकरांना निवेदन सादर
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांना मडगाव येथे एका कार्यक्रमावेळी पंचवाडी बचाव समितीतर्फे याप्रकरणी निवेदन सादर करण्यात आले. पर्रीकर यांनी येत्या विधानसभा अधिवेशनात या विषयाचा पर्दाफाश करावा, अशी विनंती त्यांच्याकडे करण्यात आली. मुळात खनिज वाहतुकीसाठी बगलरस्ता तयार करण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी खाण खातेच या रस्त्याबाबत अनभिज्ञ आहे व त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते या रस्त्यासाठी आग्रही असण्याचे कारण काय, असा सवालही समितीने केला आहे. पर्रीकर यांनी हा विषय आपण विधानसभेत उपस्थित करू व सरकारकडून याबाबत खुलासा मागवू असे आश्वासन समितीला दिले आहे.
Friday, 21 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment