नवी दिल्ली, द. १५ : वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता आधीच होरपळून निघत असतानाच सरकारने आज आणखी एक धक्का दिला असून, सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर प्रतिलीटर २.५० ते २.५४ रुपयांनी वाढविण्याची घोषणा केली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात सातच्या आसपास असलेला महागाईचा निर्देशांक डिसेंबर महिन्यात आठच्या वर गेला होता. कांदा आणि इतर भाजीपाल्यांचे दर अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतानाच सरकारी तेल कंपन्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात केलेली ही पेट्रोलची दुसरी दरवाढ आहे. या दरवाढीमुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सामान्य जनतेच्या अडचणींमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
देशातील सगळ्यात मोठी सरकारी तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑईल कंपनीने आपल्या पेट्रोलच्या दरात २.५० रुपयांनी वाढ केली आहे. आयओसीच्या या घोषणेपाठोपाठ हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशननेही आपले पेट्रोल प्रतिलीटर २.५४ रुपयांनी, तर भारत पेट्रोलियम कार्पोरेशन या तिसर्या सरकारी तेल कंपनीने आपल्या पेट्रोलचे दर प्रतिलीटर २.५३ रुपयांनी वाढविले आहेत.
गेल्या वर्षी जून महिन्यात सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केल्यापासून पेट्रोलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार निर्धारित करण्याचे अधिकार सरकारी तेल कंपन्यांना प्राप्त झाले आहेत. गेल्या १६ डिसेंबरपासून सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल तीन रुपयांनी महाग केले होते. गेल्या सहा महिन्यांतील ही सगळ्यात मोठी दरवाढ ठरली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ९२ अमेरिकन डॉलर्स प्रतिबॅरल झाल्याने ही दरवाढ अटळ होती, असे एका वरिष्ठ अधिकार्याने याबाबत माहिती देताना सांगितले. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. मनमानी करत असल्याचा आरोप होऊ नये म्हणून सरकारी तेल कंपन्यांनी वेगवेगळी दरवाढ केली असल्याची चर्चा आहे
ज्या-ज्यावेळी पेट्रोल दरवाढ झाली आहे त्या-त्यावेळी महागाई वाढली आहे असाच जनतेचा अनुभव असल्याने या दरवाढीनंतरही महागाईची झळ सोसण्याची तयारी जनतेला करावी लागणार आहे.
दरवाढ मागे घेण्याची भाजपाची मागणी
गेल्या सहा महिन्यात सरकारी तेल कंपन्यांनी केलेली ही सातवी पेट्रोल दरवाढ अन्यायकारक असून, सर्वसामान्य माणसाची एकप्रकारे लूट आहे, असा आरोप भाजपाने केला आहे. ही दरवाढ ताबडतोब मागे घ्यावी, अशी मागणी भाजपा प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना केली.
विमान इंधन दरातही दोन टक्के वाढ
सरकारी तेल कंपन्यांनी सामान्य उपयोगाच्या पेट्रोलपाठोपाठ विमान इंधन दरातही दोन टक्के दरवाढ केली आहे. यापूर्वी विमान इंधन दरात १५ डिसेंबरला ३.६ टक्के आणि १ जानेवारीला ९३५ रुपये प्रतिकिलोलीटरची दरवाढ केली होती. या दरवाढीमुळे मुंबईत विमान इंधनाचा दर ४९,०४६ रुपये प्रतिकिलोलिटर झाली आहे. सध्या हा दर ४८,०५८.५६ रुपये प्रतिकिलोलीटर एवढा होता.
-----------------------------------------------------------------
वास्को येथील पेट्रोल पंपांवरील दर ५५.६१ एवढे होते. यात २.५४ रुपयांनी वाढ झाल्यामुळे आता वाहनचालकाना ५८.१५ रुपये प्रती लीटर या दराने पेट्रोल खरेदी करावे लागणार असल्याचे अखिल गोवा पेट्रोल वितरण संघटनेचे अध्यक्ष परेश जोशी यांनी वास्को प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment