म्हापसा, दि. २० प्रतिनिधी : बोडगेश्वराच्या जत्रेस जाण्यासाठी बसची वाट पाहत रस्त्यावर येऊन थांबलेल्या आसगाव बार्देश येथील सुमन रामनाथ विश्वकर्मा या सोळा वर्षीय मुलीला एका बसने ठोकरल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दुपारी ३.१५ वाजता झालेल्या या अपघातात बसचे चाक सदर युवतीच्या डोक्यावरूनच गेल्याने घटनास्थळी भयानक दृश्य निर्माण झाले होते. या प्रकरणी आसगावातील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन सुमारे तीन तास सदर बस रोखून धरल्याने व तिची तोडफोड केल्याने तणावही निर्माण झाला होता. तसेच पोलिसांनी पंचनामा न करताच मुलीचा मृतदेह उचलून बांबोळीला पाठवल्याने ग्रामस्थांनी बराच हंगामा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळ उत्तरप्रदेश येथील व सध्या बायरो आल्त - आसगाव येथे राहणारे सदर कुटुंब बोडगेश्वराच्या जत्रेसाठी बाहेर पडले होते. रस्त्यावर येऊन ते बसची प्रतीक्षा करत होते. म्हापशाला जाणारी बस येत असतानाच समोरून हणजूणला जाणारी जीए ०१-२-५६४०या क्रमांकाची बस तिला बाजू देण्यासाठी रस्त्याच्या कडेला आली. त्यात तिची सदर मुलीला जोरदार धडक बसली व बसने तिला फरफटत ओढत नेले. यातच बसचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. तिच्या आईवडलांच्या समोरच हा अपघात झाल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली होती. ते हंबरडा फोडून रडत असताना पाहून अनेकांचे मन हेलावले.
दरम्यान, या अपघाताची आसगाववासीयांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर बसचा चालक व वाहक दोघेही तिथून पसार झाले होते. संतप्त लोकांनी येथे सुमारे तीन तास वाहतूक रोखून धरली व बसची मोडतोड केली. हणजूण पोलिसांना ही माहिती मिळताच उपनिरीक्षक पिळगावकर यांनी आपल्या सहकार्यांसह तेथे धाव घेतली व पंचनामा न करताच सदर मुलीचा मृतदेह बांबोळीला पाठवून दिला. याला जमलेल्या नागरिकांनी तीव्र हरकत घेत पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली. दरम्यान, शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर व निरीक्षक मंजूनाथ देसाईही घटनास्थळी पोहोचले. लोकांनी त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देताच पोलिसांनी शेवटी आपली चूक मान्य केली व या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या कुटुबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
बेदरकारपणे बस हाकणार्या सदर चालकाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे व अपघातग्रस्त सदर बस पुन्हा या रस्त्यावर दिसता कामा नये, अशी भूमिका येथील नागरिकांनी घेतली आहे.
Friday, 21 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment