पणजी, दि. १५ (विशेष प्रतिनिधी): महिनाभरात पेट्रोलच्या दरात दुसर्यांदा भाववाढ करणार्या केंद्र सरकारने आम आदमीला महागाईच्या आगीत जाळून मारण्याचेच ठरवले आहे. आम आदमीचे रक्षण हिताचे रक्षण करण्यास पूर्णपणे असमर्थ ठरलेल्या या सरकारला आता सत्तेवर राहाण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही. त्यामुळे या सरकारने आता पायउतार होण्याची वेळ आली आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया उत्तर गोवा खासदार व माजी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज व्यक्त केली.
पेट्रोल दरवाढीबाबत ते ‘गोवादूत’शी बोलत होते. याच महिन्यात झालेली ही दुसरी दरवाढ असून त्यामुळे सामान्य जनतेचे जगणे या सरकारने हैराण करून सोडल्याचे ते म्हणाले. पेट्रोलजन्य पदार्थांची भाववाढ झाली की, त्याचा परिणाम साहजिकपणे इतर वस्तूंवर होत असतो. वाहतूक खर्च वाढला की, लगेच जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, इतर उत्पादने व साहित्याची दरवाढ होते. सरकारला या गोष्टींची कल्पना नाही का? जर सरकारला या गोष्टींची कल्पना आहे तर भाववाढ रोखण्यासाठी किंवा ती नियंत्रणात ठेवण्यासाठी या सरकारने काही उपाययोजना तरी केली का, असा संतप्त सवालही नाईक यांनी केला.
या दरवाढीमुळे आधीच महागाईच्या प्रचंड ओझ्याखाली दबलेल्या सामान्य माणसाचे जीवन आता अगदीच कठीण बनले आहे. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी गेले काही दिवस महागाई झालीय हे मान्य करायलाच तयार नव्हते. आता महागाईपुढे सरकार हवालदिल झाल्याचे ते सांगतात. याचाच अर्थ महागाईचा भस्मासुर आम आदमीमागे लागला आहे ही वस्तुस्थिती त्यांनी मान्य करतानाच महागाई रोखण्यास केंद्रातील संपुआ सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे कबूल केले आहे. त्यामुळे अशा अकार्यक्षम सरकारला सत्तेच्या गादीवर पहुडण्याचा कोणताही नैतिक अधिकार पोचत नसल्याचे नाईक यांनी ठणकावून सांगितले.
Sunday, 16 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment