Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 17 January 2011

आपल्या आवाजातच स्वतःची ओळख घडवा : पं.हरिहरन

पणजी, दि. १६ (शैलेश तिवरेकर): आज प्रत्येक कार्यक्रमात किंवा ‘रिऍलिटी शो’ मध्ये नवोदित गायक नामांकित गायकांच्या आवाजाची नक्कल करतात म्हणूनच ते पुढे टिकू शकत नाहीत. मूळ गायक असताना नक्कल करणार्‍या गायकाला संधी द्यावी असे कोणत्या निर्मात्याला वाटेल? म्हणूनच गायन क्षेत्रात शिखर गाठायचे असल्यास नवोदितांनी स्वतःचा आवाज ओळखून आपल्या आवाजातूनच स्वतःची ओळख निर्माण करणे आवश्यक आहे, असे नामवंत गायक पद्मश्री पं. हरिहरन यांनी सांगितले
स्वस्तिक यांनी कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर कलामंदिरात आयोजित केलेल्या ‘श्याम ए गजल’ या कार्यक्रमानिमित्त ते गोव्यात आले असता त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला. पद्मश्री पं. हरिहरन पुढे म्हणाले की रिऍलिटी शो हे आपले ध्येय गाठण्याचे माध्यम असते. त्याच्यात मिळालेल्या छोट्यामोठ्या बक्षिसाने हुरळून न जाता आणखी मेहनत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. जो हे करतो तोच गायक म्हणून या स्पर्धात्मक क्षेत्रात चिरंतर टिकू शकतो.
गोव्यात या अगोदर आपण चार वेळा कार्यक्रम केले असून येथे शास्त्रीय संगीत आवडीने ऐकणारे लोक अनेक आहेत. ते गायकाला वेळोवेळी प्रोत्साहन देत असतात. आज संगीताचा दबदबा वाढला असून त्यामुळे नवयुवक भारतीय संस्कृतीपासून दुरावत चालले आहेत, याविषयी बोलताना ते म्हणाले की चित्रपटसंगीत हे चांगले आहे, पण त्याला मर्यादा असणे आवश्यक आहे. आज जळीस्थळी चित्रपट गीते ऐकायला मिळतात. मुलांवर बालपणापासून तेच संस्कार होत असल्याने तरुणपणात त्यांना शास्त्रीय संगीताची आवड निर्माण होत नाही. शिवाय चित्रपट संगीत म्हणा किंवा त्यातील वेशभूषा असो किंवा अन्य गोष्टी त्यावर पाश्‍चात्त्य संस्कृतीची छाप असते आणि अशा गोष्टींचा प्रसार जास्त होत आहे. जी वाट सहज मिळते त्या वाटेने कुणीही जाणारच. म्हणूनच कोणत्याही माध्यमातून का असेना शास्त्रीय संगीत किंवा भारतीय संस्कृतीचा प्रसार होणे आवश्यक आहे.
दक्षिण भारतात शास्त्रीय संगीताचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तेथे शास्त्रीय संगीताला धार्मिकतेची जोड आहे. साहजिकच तेथे दक्षिणात्य शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असतात. विदेशात प्रत्येक शाळांतून संगीत विषय आठवड्यातून दोन वेळा शिकवणे सक्तीचे आहे, परंतु भारतात मात्र तसे दिसत नाही. म्हणूनच जे बालपणापासून कानावर पडते त्याकडे मुलं ओढली जातात. चित्रपटात पाश्‍चात्त्य संगीताचा भडिमार केला जातो. याचे कारण म्हणजे जसा समाज बदलत जातो त्याप्रमाणे चित्रपट दुनिया बदलत जाते. निर्माते विकाऊ माल तयार करण्याचा प्रयत्न करतात आणि कोणताही व्यावसायिक तेच करेल म्हणून त्यांनाही शंभर टक्के दोषी म्हणता येणार नाही. आज सुसंस्कृत समाज निर्माण होणे काळाची गरज आहे समाज बदल्यास सर्व गोष्टी बदलतील, असेही पद्मश्री पं. हरिहरन यांनी सांगितले.
३ एप्रिल १९५५ साली केरळ येथील थिरूवानाथापूरम येथे जन्मलेले हरीहरन यांचे बालपण मुंबईतच गेले. नंतर त्यांनी एस.आय. इ. एस. कॅालेजमधून विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केली. कै. श्रीमती अलामलू आणि एच ए एस मणी यांच्याकडून संगीताचे प्राथमिक धडे घेतले. त्याच बरोबर त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचाही अभ्यास करून उस्ताद गुलाम मुस्ताफा खान यांच्याकडे तालीम घ्यायला सुरुवात केली, त्यावेळी दिवसातून ९ तास ते रियाज करायचे. नंतर त्यांचा कल गझल गायनाकडे जास्त वळल्याने त्यांनी उर्दू भाषाही शिकून घेतली. नंतर त्यांना गजल गायनाबरोबरच चित्रपट संगीत क्षेत्रातही आपला चांगला जम बसवून ते आपल्या कलेने जगप्रसिद्ध झाले. त्यांनी हिंदी, तामीळ, मल्याळम, कन्नड,मराठी, तेलगू आणि बंगाली अशा भाषांतील अनेक चित्रपटांतून हजारो गीते म्हटली आहेत. १९९५ ते २०१० या कालावधीत त्यांना अनेक नामांकित पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपटमहोत्सवातील उत्कृष्ट गायक पुरस्कार, स्वरालय कैराली येसूदास पुरस्कार, तामिळनाडू राज्यपुरस्कार, आंध्र प्रदेश नंदी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत.

No comments: