गोवा मानसोपचार व मानवी स्वभाव संस्थेतील प्रकार
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): गोवा मानसोपचार व मानवी स्वभाव संस्थेतील एक वरिष्ठ अधिकारी अल्प वेतनावर काम करणार्या कंत्राटी कामगारांना बढत्या देण्याच्या निमित्ताने पैसे उकळत असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. अलीकडेच एका कंत्राटी पद्धतीवरील ‘पेशंट अटेंडट‘ पदावरील कामगाराला सेवेत नियमित करण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये लाच घेण्यात आल्याचा आरोपही त्यांच्यावर होत आहे. या पदासाठी पात्र असलेल्या एका कामगाराला डावलून ही नियुक्ती करण्यात आल्याने सदर कामगाराने या अधिकार्याचा पर्दाफाश करण्याचे ठरवले आहे.
विर्डी साखळी येथील रहिवासी असलेल्या एका कंत्राटी कामगाराने या संपूर्ण घोटाळ्याचा पोलखोल केला. हा कामगार गेली आठवर्षे कंत्राटी पद्धतीवर काम करीत असून अजूनही सेवेत नियमित होत नाही. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या दारी गेली दोन वर्षे आपण हेलपाटे घालत आहोत, आज, उद्या असे करून गेली दोन वर्षे आपल्याला लटकवण्यात येत अल्याचे तो म्हणाला.
२००२ साली गोवा कंत्राटी कामगार सोसायटीअंतर्गत तो कामाला लागला. २००८ साली सोसायटीअंतर्गत कंत्राटी कामगारांची थेट खात्याअंतर्गत नेमणूक करण्यात आली. गोवा मानसोपचार व मानवी स्वभाव संस्थेअंतर्गत चतुर्थश्रेणी कामगार भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी आपण अर्ज करून मुलाखत दिली. यावेळी यादीत पहिले नाव आपले असूनसुद्धा आपल्याला नियमित पदासाठी डावलण्यात आले. मुळात आपल्यानंतर दोन वर्षांनी सोसायटीत दाखल झालेल्या व नंतर नियमित पदासाठी अर्ज केलेल्या अन्य एका सहकार्यांची निवड या पदावर करण्यात आली. आपण याबाबत जाब विचारण्यासाठी गेलो असता आपल्याकडे थेट दीड लाख रुपयांची मागणी करण्यात आली,असा आरोप या कामगाराने केला आहे. आपल्या सहकार्याची सफाई पदावर नियमित नेमणूक करण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये घेण्यात आल्याचा दावाही या कामगाराने केला आहे.
अलीकडेच कंत्राटी पद्धतीवरच सफाई कामगार म्हणून नेमण्यात आलेल्या सुमारे आठ कामगारांना ‘पेशंट अटेंडट’ म्हणून बढती देण्यात आली. त्यासाठी प्रत्येकाकडून दहा हजार रुपये लाच घेण्यात आल्याचा आरोपही या कामगाराने केला आहे. आधीच अल्प वेतनावर काम करणार्या या कामगारांना कंत्राटी पद्धतीवरील बढतीचे आमिष दाखवून त्यांच्याकडूनही पैसे उकळण्याचा हा प्रकार म्हणजे मढ्याच्या टाळूवरील लोणी चाटण्याचाच प्रकार आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
सदर अधिकारी हा प्रकार स्वतःहून करीत आहेत की, कुणाच्या सांगण्यावरून हे अजून कळलेले नाही. आरोग्यमंत्र्यांनी यात त्वरित लक्ष घालून सामान्य कामगारांची सुरू असलेली ही छळणूक थांबवावी, असे आवाहन या कामगाराने केले आहे.
Sunday, 16 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment