मडगाव, दि. १९ (प्रतिनिधी)
गोव्यातील कासावली येथे गेले दोन महिने लपून बसलेल्या मणिपूरमधील ‘पूल्फा’ या नक्षलवादी मानसिकता असलेल्या संघटनेच्या चार खतरनाक सदस्यांना तेथील पोलिस व लष्करी अधिकार्यांनी येथे येऊन अटक केल्याने गोवा पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या नाकर्तेपणाचा पुन्हा एकदा पंचनामा तर झाला आहेच; पण त्याचबरोबर गोव्याच्या अन्य भागांतही असे आणखी कितीतरी अतिरेकी मनोवृत्तीचे लोक दडी मारून बसले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने गोव्यात सर्वत्र केला जाणारा बंदोबस्त व घेतली जाणारी खबरदारी ही किती फोल व कुचकामी आहे हेही त्याबरोबरच दिसून आले आहे.
‘पीपल्स युनायटेड लिबरेशन फ्रंट’ ही ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट ’ या आसाममधील बंडखोर संघटनेइतकीच जहाल व नक्षलवादी मनोवृत्तीची संघटना मानली जाते व म्हणून तिच्यावर तेथे बंदीही जारी आहे. मणिपूरमध्ये दंगली घडवून व हत्या करून आलेल्या या चौघांत एका महिलेचाही समावेश असावा, यावरून या लोकांना कसे पद्धतशीरपणे ‘तयार’ करण्यात येते ते दिसून येते.
डिसेंबरच्या मध्यास ही मंडळी गोव्यात आली व कोणाच्या लक्षात सहसा न येणार्या कासावलीतील एका हॉस्टेलमध्ये मुक्काम ठोकून राहिली यावरून अशा वृत्तीच्या लोकांसाठी भूतलावरील नंदनवन म्हणून गणला जाणारा गोवा कसा सुरक्षित आश्रयस्थान बनत चालला आहे ते दिसून आले आहे. ही मंडळी बिनधास्तपणे गोव्यात आली, त्यांची राहण्याची व्यवस्था झाली, तरीही गोवा पोलिसांना त्याचा थांगपत्ताही लागला नाही. मध्यंतरी भारताच्या राष्ट्रपती गोव्यात येऊन गेल्या व त्यांचा येथे काही दिवस मुक्कामही राहिला. त्यांच्या या मुक्कामानिमित्ताने तर राज्यात अतिदक्षताही जारी केली होती; पण तरीही या नक्षल्यांचा गुप्तचर विभागाला थांगपत्ताच लागला नाही.
यापूर्वी आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस् शोभराज याला मुंबई पोलिसांनी गोव्यात येऊन पर्वरी येथील एका हॉटेलातून ताब्यात घेऊन नेईपर्यंत गोवा पोलिसांना त्याची खबरबातही नव्हती. अन्य अनेक प्रकरणातही असेच घडलेले आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी पोलिस यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहेत. बेळगावात गेल्या आठवड्यात जप्त केलेल्या हशीश प्रकरणातील दोन्ही नेपाळी युवती तब्बल दोन वर्षे गोव्यात होत्या व त्यांचा पोलिसांशी घनिष्ठ संबंध होता हे आता बेळगाव पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आले आहे व ही बाबही गोवा पोलिसांच्या निष्क्रियतेकडेच अंगुली निर्देश करीत आहे. एरवी पोलिस एकाच नजरेत गुन्हेगाराला ओळखतात असे मानले जाते; पण गोवा पोलिसांसाठी मात्र हा अपवाद ठरला आहे. गोव्यातील मंदिरफोडीच्या घटना, अमली द्रव्यांचे वाढते प्रस्थ ही त्याची उदाहरणे मानली जातात. बंद झालेली पोलिस बीट पद्धत, त्यातून परप्रांतीयांबाबत पोलिसांकडे न येणारी माहिती व समर्पित असा गुप्तचर विभाग स्थापन करण्याकडे राजकीय स्तरावरून केली जाणारी चालढकल ही या मागील कारणे असल्याचे काही पोलिस अधिकारी खासगीत सांगताना दिसत आहेत.
परप्रांतीयांना भाड्याने दिली जाणारी घरे वा हॉटेले, हॉस्टेले यातील त्यांचा मुक्काम याबाबतचा तपशील पोलिसांना सादर करण्याची सक्ती असली तरी त्याच्या अंमलबजावणीकडे मात्र कोणाचाही कटाक्ष नाही. याचाच फायदा सरसकट सर्वच घेतात. कासावलीत ‘पुल्फा’च्या सदस्यांना झालेल्या अटकेने तेच दाखवून दिले आहे. पेडण्यापासून पाळोळेपर्यंतच्या किनारपट्टीत पर्यटन व्यवसायाच्या नावाखाली हजारो परप्रांतीय मुक्काम ठोकून असून त्या सर्वांची छाननी केली तर अशी आणखी कितीतरी मंडळी उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Thursday, 20 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment