सरकारच्या गैरकृत्यांवर श्रेष्ठींचे पांघरूण
ड्रग प्रकरणावरून प्रदेश कॉंग्रेस बैठक गाजली
‘तो’ रॉय माझा पुत्र नव्हे : रवी
निवडणूक जड जाईल : माविन
बलात्कार, ड्रग देशभरातच : चर्चिल
महिलांबाबत सरकार बेफिकीर : मामी
कार्यकर्त्यांना किंमतच नाही : अन्य सारे
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): ‘‘ड्रग व्यवहाराचा जो काही बागुलबुवा उभा केला जातो आहे त्याला पुरावे काय? रॉय नाईक याचा ड्रग व्यवहाराशी संबंध असल्याचे सिद्ध करा, जरूर कारवाई करू’’; अशी तिरसट उत्तरे देत कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा पक्षाचे प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू होताच पत्रकार परिषदेतून काढता पाय घेण्याची घटना आज घडली. जाता जाता राज्यातील आघाडी सरकारच्या कामगिरीवर श्रेष्ठी पूर्णपणे समाधानी आहेत, असे प्रमाणपत्रही त्यांनी देऊन टाकले.
गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीची आजची सर्वसाधारण सभा बरीच वादळी ठरली. पर्वरी येथील एका बड्या हॉटेलात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला उपस्थित कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्याच सरकारचे वाभाडे काढून सरकारचे प्रभार्यांसमोरच वस्त्रहरणच केले. यावेळी झालेल्या चर्चेत अनेक नेत्यांनी एकमेकांवरच आरोप प्रत्यारोप सुरू केल्याने श्री. हरिप्रसाद यांच्यासाठी ही बैठक एक डोकेदुखीच ठरली, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. दरम्यान, या बैठकीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, पत्रकारांनी एकामागोमाग एक प्रश्न उपस्थित करताच त्याची उत्तरे देणेही श्री. हरिप्रसाद यांच्यासाठी जड गेले. ड्रग्स प्रकरणावरून पत्रकारांनी प्रश्नांची सुरुवात करताच गडबडलेल्या हरिप्रसाद यांच्या मदतीला अखेर मुख्यमंत्रीच धावून आले. सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ‘एसआयटी’ची स्थापना केली आहे व ती योग्य पद्धतीने चौकशी करेल, असे सांगून त्यांनी पत्रकार परिषदच आटोपती घेतली.
माविनचा पुन्हा रुद्रावतार!
सभेला सुरुवात होताच उपसभापती माविन गुदिन्हो यांनी कालचा रुद्रावतार पुन्हा एकदा धारण करून राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर भरपूर तोंडसुख घेतले. पोलिसांच्या विविध गुन्हेगारी प्रकरणांंमुळे समाजात फिरणेही कठीण बनले आहे. त्यामुळे जनता सरकारचे धिंडवडे काढीत असल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. विविध ख्रिस्ती धर्मगुरू आपल्याकडे या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करतात व ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास कॉंग्रेससाठी पुढील निवडणूक कठीण जाईल, असे सरळ मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, मावीन यांच्या या वक्तव्याला चर्चिल आलेमाव यांनी जोरदार आक्षेप घेतला. ज्या कुणाला निवडणुकीत जिंकून येण्याची खात्री नाही त्यांनी निवडणूक लढवू नये, असे ते म्हणाले. ड्रग व्यवहार केवळ गोव्यातच नाही तर संपूर्ण देशात चालतो व बलात्कार होण्याचे प्रकारही जगभरात होतात, अशी पुस्तीही जोडण्यास त्यांनी कमी केले नाही.
दरम्यान, चर्चिल यांच्या या विधानाला अनेकांनी आक्षेप घेत जगाचे नको पण गोव्यात असले प्रकार घडता कामा नयेत, असे त्यांना सुनावले. सांताक्रुझच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनीही या विधानाचा निषेध करून महिलांबाबत सरकार बेफिकीरपणे वागत असल्याचा आरोप केला. मावीन यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे नाराज बनलेल्या रवी नाईक यांनी वीज घोटाळा प्रकरण उरकून काढण्याचा टोला हाणल्याने वातावरण अधिकच गढूळ बनले.
‘तो’ रॉय माझा पुत्र नव्हे : रवी
ड्रग प्रकरणी ‘रॉय’ हे नाव घेतले जाते म्हणजे तो आपलाच पुत्र आहे असे कुणी समजू नये. ड्रग प्रकरणांत पोलिसांना अनेक ‘रॉय’ नामक व्यक्तींचा सहभाग आढळून आला आहे व त्यामुळे खरा ‘रॉय’ कोण हे लवकरच उघड होईल, अशी नवीच पुडी यावेळी गृहमंत्री रवी नाईक यांनी सोडली. गोव्यातील ड्रग व्यवहाराचा पर्दाफाश आपण केला व त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे अनेकांचे हप्ते बंद झाले आहेत व त्यामुळेच आपल्यावर टीका केली जात असल्याचा आव त्यांनी आणला. विरोधक भुंकतात आणि त्याला आपल्या पक्षाचेही काही नेते साथ देतात असे सांगून त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
सरकारकडून कार्यकर्त्यांची परवड
सरकारच्या एकाही मंत्र्याला पक्षाचे पडून गेले नाही. कॉंग्रेस भवनात एकही मंत्री भेट देत नाही व कॉंग्रेस कार्यकर्त्यांना हे नेते किंमतही देत नाहीत, अशी खंत अनेकांनी बोलून दाखवली. रोजगाराच्या बाबतीत हे नेते केवळ आपल्या मतदारसंघांचाच विचार करतात व एकाही कार्यकर्त्यांचे काम होत नाही. पक्षाला कार्यकर्त्यांची गरज नाही तर उद्या निवडणुका कुणाच्या बळावर लढवणार, असा सवाल करून काही पदाधिकार्यांनी नेत्यांना फैलावर घेतले. यावेळी हरिप्रसाद यांनी हस्तक्षेप करून सरकारी नोकर्यांतील काही जागा कार्यकर्त्यांसाठी राखून ठेवा, असा सल्ला नेत्यांना दिला.
या बैठकीला बहुतांश आमदार व मंत्री गैरहजर राहिले. चर्चिल आलेमाव, ज्योकीम आलेमाव, खासदार फ्रान्सिस सार्दीन, मावीन गुदिन्हो, आलेक्स सिक्वेरा, पाळीचे आमदार प्रताप गावस आदी नेते हजर होते. बाबूश मोन्सेरात, विश्वजित राणे, बाबू आजगावकर आदी नेत्यांच्या गैरहजेरीचा मुद्दाही अनेकांनी उपस्थित केला.
Saturday, 22 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment