पालिका निवडणूक
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)- पालिका निवडणुका ३१ ऑक्टोबर २०१० रोजी घेण्याची घोषणा करूनही अद्याप आरक्षणाबाबत सरकार "मौन' धारण करून आहे. ज्याअर्थी पालिका निवडणुकीची अधिसूचनाही जारी होत नाही त्याअर्थी सरकार जाणीवपूर्वक चालढकलपणा करीत आहे, असा सनसनाटी आरोप भाजप विधिमंडळ प्रवक्ते आमदार दामोदर नाईक यांनी केला. लोकांना अंधारात ठेवून शेवटी आपल्या मर्जीनुसार निवडणुका घेण्याचा हा डाव असून भाजपकडून कॉंग्रेस आघाडी सरकारच्या या कृतीचा निषेध करीत असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पालिका निवडणुकीत इतर मागासवर्गीयांना १९.५ टक्के आरक्षण देण्याचे ठोस आश्वासन पालिकामंत्री ज्योकिम आलेमाव यांनी गत विधानसभा निवडणुकीत दिले होते. आता पालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर करूनही आरक्षणाचे धोरण मात्र निश्चित होत नाही, याचा अर्थ काय? असा सवालही यावेळी आमदार नाईक यांनी केला. निवडणूक आयोगाने तयार केलेल्या नव्या मतदारयादीत असंख्य चुका आहेत. प्रत्येक पालिका प्रभागांची भौगोलिक रचना निश्चित केल्यानंतरच मतदारयादी तयार करावी, अशी मागणी होत असताना यावेळी मतदारयाद्यांत बराच घोळ घालण्यात आला आहे. आपल्या मर्जीतील ठरावीक लोकांना फायदेशीर ठरेल अशा पद्धतीनेच मतदारयाद्यांची रचना केली जाण्याचीही शक्यता यावेळी आमदार दामोदर नाईक यांनी व्यक्त केली. पालिका निवडणुका जाहीर झाल्या परंतु विविध गटांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागांची घोषणा झाली नसल्याने निवडणुकीत उतरण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांत संभ्रम निर्माण झाला आहे. एकार्थाने हा सरळ जनतेचा विश्वासघात असल्याची टीका त्यांनी केली.
पालिका प्रशासन तथा राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू असलेला हा विलंब निषेधार्ह आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवाराला आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली पाहिजे व त्यासाठी आवश्यक वेळ देणे गरजेचे आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच वेठीस धरून आपल्या मर्जीप्रमाणे कारभार हाकण्याचाच हा प्रकार आहे. सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने हा अत्यंत घातक पायंडा असल्याचा ठपका आमदार दामोदर नाईक यांनी ठेवला.
Saturday, 25 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment