Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 22 September 2010

राज्याचे गृहमंत्रीच असुरक्षित!

रवी नाईक यांना 'झेड प्लस' सुरक्षा
रितेश, रॉयला अंगरक्षक पुरवणार

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): कळंगुट येथे छापा टाकून अटक करण्यात आलेल्या मायकल फर्नांडिसच्या "गॅंग'कडून धक्कादायक माहिती उघडकीस आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. "झेड' सुरक्षा वरून त्यांना आता "झेड प्लस' दर्जाची सुरक्षा पुरवली जाणार आहे. तर, त्यांच्या दोन्ही मुलांनाही सुरक्षा रक्षक पुरवण्याचा प्रस्ताव पोलिस खात्याकडे आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि सभापती यांनाच "झेड प्लस' सुरक्षा पुरवण्यात येत असताना रवी नाईक यांच्या सुरक्षेबाबत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले गृहमंत्रीच सध्या असुरक्षित असल्याचे उघड झाले आहे.
""आमच्याकडे अशा प्रकारचा प्रस्ताव आला आहे. मात्र त्यावर कोणतीही अधिक माहिती देऊ शकणार नाही. गृहमंत्र्यांच्या मुलांना सुरक्षा रक्षक पुरवण्यासाठी हा प्रस्ताव आहे'' असे गोवा पोलिस खात्याचा सुरक्षा विभाग सांभाळणारे पोलिस अधीक्षक टोनी फर्नांडिस यांनी सांगितले. दि. १७ सप्टेंबर रोजी झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीत पोलिस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक दोन्ही जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक व केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी यावेळी उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे.
गृहमंत्री रवी नाईक यांना यापूर्वी "झेड' दर्जाची सुरक्षा होती. आता ती "झेड प्लस' करण्यात आली आहे. मात्र, अचानक त्यांच्या दोन्ही मुलांना अंगरक्षक पुरवण्यासाठी प्रस्ताव आल्याने त्यांना नेमका कोणता धोका असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे, हे सांगण्यास मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी नकार दिला. रितेश आणि रॉय नाईक यांना अंगरक्षक पुरण्याच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
मात्र खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रॉय नाईक यांनी पणजीतील सुरक्षा विभागातील किंवा गुन्हा अन्वेषण विभागातील अंगरक्षक घेण्यास नकार दिला दिसून फोंडा पोलिस स्थानकातील पोलिसच अंगरक्षक (पीएसओ) म्हणून ठेवणार असल्याचे कळवले आहे. गृहमंत्र्यांच्या दोन्ही मुलांना अंगरक्षक पुरवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे श्री. फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मायकल फर्नांडिस याच्याकडून भयानक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या माहितीनुसार गृहमंत्र्यांसह त्यांच्या मुलांनाही धोका असल्याचे उघड झाले होते. तसेच, अजून एका मुख्य सूत्रधाराचा पोलिस शोध घेत असून तो गायब असल्याची माहिती मिळाली आहे.

No comments: