(मडगाव स्फोटप्रकरण)
मडगाव, दि. २३ (प्रतिनिधी): गेल्या वर्षी दिवाळीच्या पूर्वसंध्येला मडगावात झालेल्या स्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून गोवा पोलिस खात्यातील उपनिरीक्षकांनी एकेक करून त्या यंत्रणेतून मुक्तता करून घेतली आहे. आता उरलेल्या एकमेव उपनिरीक्षकानेही यंत्रणेतून मुक्त करावे अशी विनंती केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. सदर तपास यंत्रणेला गोवा पोलिस तपास कार्यात साह्य करीत होते; पण तपास यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी चपराशासारखी कामे करून घेतात व वरून अविश्वास दाखवितात, पदरमोड करून सर्वत्र जावे लागते, अशा गोवा पोलिसांच्या तक्रारी आहेत.
या तपास यंत्रणेचे अधीक्षक असलेले विजयन ही जबाबदारी सोडून केरळात पूर्ववत पोलिस खात्यात रुजू झाले आहेत. ते स्वभावाने चांगले होते व सर्वांना मार्गदर्शन करून काम करून घेत असत. परंतु, केंद्रीय गृहखात्याकडून दबाव व हस्तक्षेप होत असल्याने निःपक्षपातीपणे तपास करता येत नाही, या कारणासाठी त्यांनी येथील जबाबदारी सोडल्याचे समजते. तपास यंत्रणेपेक्षा गोवा पोलिसांनी सुरुवातीस योग्य मार्गाने तपास सुरू केला होता. परंतु, ती जबाबदारी राष्ट्रीय तपास यंत्रणेवर सोपविल्याने या तपासाची गती धीमी झाली व तपास योग्य दिशेने जाऊ शकला नाही, असेही गोवा पोलिस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विभागात मडगाव पोलिस जायला तयार नाहीत. दिवसरात्र काम करायचे व वरून बोलणी खायची, गोव्याबाहेर कित्येक तपासासाठी जाताना सर्व खर्च खिशातून करायचा, अशा अनेक कारणामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी तेथून सुटका करून घेतल्याचे माहिती मिळाली आहे.
Friday, 24 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment