Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 25 September 2010

मूळ प्रश्नाला बगल देण्याचीच "सुपारी'?

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)- पोलिस-ड्रगमाफिया प्रकरणात आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रावर झळकलेल्या रॉय नाईक याला मारण्यासाठी दिलेल्या "सुपारी' प्रकरणाला आता राजकीय रंग चढायला लागला आहे. त्यामुळे हे "सुपारी' प्रकरण नेमके काय आहे, याबद्दलच शंका निर्माण झाली आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी आणि ड्रग प्रकरणाला बगल देण्यासाठीच हे "सुपारी' नाट्य रचण्यात आले नाही ना, अशीही जोरदार चर्चा सध्या पोलिस खात्यातच सुरू झाली आहे. दरम्यान, यापूर्वी पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी या "सुपारी' प्रकरणात कोणतेही तथ्य आढळून न आल्यास रॉय याला देण्यात आलेली सुरक्षा काढून घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
एका गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांकडून मिळाल्या माहितीनुसार, या धमकी प्रकरणात अद्याप कोणतेच तथ्य आढळून आलेले नाही. पोलिसांच्या हाती अद्याप ठोस पुरावे लागलेले नाहीत, केवळ संशयावरून हालचाली केल्या जात आहेत. चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आलेल्या संशयिताकडून गृहमंत्र्याच्या मुलाला मारण्याची सुपारी घेतल्याची माहिती उघडकीस येणे, यावरही अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच, पोलिसांनीही या "सुपारी' प्रकरणाबाबत अधिकृतरीत्या काहीही स्पष्ट केलेले नाही.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, यात धमकीचा काहीसा अंश ग्राह्य धरला तरी अद्याप याविषयीचे कोणतेही पुरावे पोलिसांच्या हाती लागलेला नाहीत.
रॉय नाईक याला संपवण्यासाठी त्याची "सुपारी' देण्याएवढे त्याने काय केले आहे? त्याची कोणाशी एवढी दुश्मनी निर्माण होण्यामागचे कारण काय? याबाबतही तर्कवितर्क सुरू आहेत. या एकंदरीत प्रकारामागे खाण, अमलीपदार्थ व्यवसाय की राजकारण आहे, असा संभ्रम जनतेच्या मनात उत्पन्न झाल्याने याचा सोक्षमोक्ष लावून सत्य जनतेसमोर मांडणे पोलिसांसाठी अनिवार्य झाले आहे.
आधीच गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप झालेल्या रॉय नाईक याला जिवंत मारण्यासाठी सुपारी दिली असल्याची माहिती उघडकीस आल्याने या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. रॉय नाईक याला मारण्यासाठी खरोखरच "सुपारी' देण्यात आली आहे तर राज्यात माफियांनी पाय रोवल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे गृहमंत्र्यांचा गोवा सुरक्षित असल्याचा दावा फोल ठरतो, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

No comments: