Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 20 September 2010

गोव्यात चीनी बनावटीचे डॉप्लर रडार नको

संरक्षण खात्याकडून महत्त्वपूर्ण सूचना

प्रीतेश देसाई
पणजी, दि. १९ ः सुरक्षेच्या दृष्टीने चीनी बनावटीचे "डॉप्लर रडार' न बसवण्याची सूचना संरक्षण खात्याने गोव्यातील हवामान खात्याला केली आहे. केंद्र सरकारने करोडो रुपये खर्च करून चीन कडून वादळाची तीव्रता आणि अचूक दिशा दाखवणारे डॉप्लर रडार विकत घेतले आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणावरून हे रडार किनारपट्टीवर असलेल्या कोणत्याही राज्याने बसवू नयेत, अशी सूचना संरक्षण खात्याने केली असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे. त्याऐवजी किनारी राज्यांसाठी आता भारत इलेक्ट्रॉनिक कंपनी खास रडार बनवणार आहे.
या सूचनेमुळे मुंबईतही हे रडार बसवण्यात आले नसल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी या चिनी बनावटीच्या रडारना नौदलाने विरोध केला होता. येत्या काही महिन्यांत गोव्यात हे रडार बसवण्यात येणार होते. त्यासाठी बहुमजली टॉवरही आल्तिनो येथे उभारण्यात आला आहे. मात्र, संरक्षण खात्याने केलेल्या या सूचनेमुळे ते रडार पुन्हा माघारी पाठवले जाण्याची शक्यता आहे. किनारपट्टी क्षेत्रातील राज्यांसाठी आता भारत इलेक्ट्रॉनिक कंपनी वादळाची तीव्रता आणि दिशा दाखवणारे रडार बनवणार असल्याची माहिती अधिकृत सूत्राने दिली.
संरक्षण खात्याने हा विरोध केला असल्याने हे चिनी रडार बसवले जाणार नाही. परंतु, देशातील ग्रामीण भागात हे रडार बसवण्यास कोणताही हरकत नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीकडून बनवले जाणारे रडार हे चिनी बनावटीच्या रडार पेक्षा मोठे असून त्यांची किंमतही कमी आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत गोव्यात हा रडार बसवण्याची शक्यता आहे. चीन बनावटीचे रडार भारतात आले असून काही भागात ते बसवण्यातही आले आहेत. ""या चिनी बनावटीच्या "डॉप्लर रडारना' बसवण्यात आलेल्या "सर्किट'वर संशय घेण्यास जागा राहते. या "सर्किट'द्वारे चिनी वैज्ञानिकांना आम्ही वाट मोकळी करून देतो. त्यामुळे त्यांना किनारपट्टी क्षेत्रात आणि लष्कराचा वावर असलेल्या ठिकाणाच्या आसपास बसवण्यास विरोध केला जात आहे'' असे सूत्रांनी सांगितले.
"फियान'वादळावेळी हवामान खाते या वादळाबद्दल अचूक माहिती देऊ शकले नव्हते. त्यामुळे अशा प्रकारचे रडार बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रडारमुळे येणाऱ्या वादळाची अचूक माहिती उपलब्ध होणार असून त्याची तीव्रताही काढता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. चीनी बनावटीच्या या एका डॉप्लर रडारची १२ कोटी रुपये किंमत आहे. तर, भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीद्वारे बनवल्या जाणाऱ्या रडारची किंमत ९ कोटी रु. असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

No comments: