पत्रकारांनी त्रुटींकडे लक्ष वेधले
पणजी, दि. २८ (विशेष प्रतिनिधी): भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ज्या गतीने पुढे सरसावत आहे त्यासंबंधी आज महोत्सवाचे संचालक एस. एम. खान यांनी समाधान व्यक्त केले. आत्तापर्यंत ६५०० प्रतिनिधींची नोंदणी झाली असून, महोत्सवातील पुन्हा प्रदर्शित करण्यात येणाऱ्या चित्रपटांसहित सर्व चित्रपट "हाउसफुल' होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना खान यांनी, उत्कृष्ट चित्रपट निवड तसेच प्रख्यात दिग्दर्शकांच्या उपस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय व इंडियन पॅनोरमातील चित्रपटांच्या प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
येणाऱ्या दिवसांत इफ्फीतील सहभाग व प्रतिसाद वाढतच राहणार असल्याचे ते पुढे म्हणाले. ३० रोजी कला अकादमीच्या खुल्या रंगमंचावर आयोजित करण्यात आलेला "टी-२०' चित्रपटांचा निकाल आणि "फिल्म फॅशन शो' हे आकर्षण ठरणार आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक अजय शुक्ला या फॅशन शोचे सूत्रधार असून चित्रपट सृष्टीतील नामवंत व्यक्ती त्यावेळी हजर राहणार आहेत. यात भाग घेणारे मॉडेल्स देविका राणी ते राणी मुखर्जी पर्यंतच्या कालावधीतील फिल्ममधील फॅशन यावेळी प्रदर्शित करणार आहेत.
३ डिसेंबर रोजी समारोप सोहळ्यास इतर मान्यवरांसोबतच प्रसिद्ध अभिनेते मामुट्टी उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेत, पत्रकारांनी आयोजनातील त्रुटीवर त्यांचे लक्ष वेधले व आयोजकांनी त्यात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. आयनॉक्स संकुलातील अन्न पदार्थांच्या दरातील भरमसाठ वाढीसंबंधी काहीजणांनी तक्रार केली. तर काही जणांनी १८ जून रस्त्यावर, इफ्फी प्रतिनिधींसाठी सूट देण्याचे जाहीर करूनही रेस्टॉरंटमधून कॉफी ५२ रुपये प्रमाणे विकण्यात येत असल्याचे सांगताना, त्यापेक्षा बियर स्वस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी मनोरंजन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव आणि मनीष देसाई उपस्थित होते.
Sunday, 29 November 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment