पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): अमली पदार्थविरोधी पथकाने आज एका मोठ्या छाप्यात सुमारे १० लाख रुपयांचा चरस जप्त केला असून या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यात तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. नेपाळ येथून रेल्वेमार्गे गोव्यात आल्यानंतर हणजुण येथे जाताना त्याना काल रात्री अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडे ९ किलो ८६५ ग्राम चरस आढळून आला. यात भीम बहादूर रोका, मनीत रोका, बागराज थापा, देवीलाल बुद्धा, माया पुंज व निलकुमारी थापा यांना अटक करण्यात आली आहे. येवढ्या चरस कोणाला देण्यासाठी आणला होता, याचा तपास पोलिस घेत आहेत. एका घटनेत सहा जणांना ताब्यात घेण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी माहिती पोलिसांनीच दिली.
अधिक माहितीनुसार थीवी मार्गे हणजूण येथे काही नेपाळी लोक अमली पदार्थ घेऊन जाणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार एक पथक रात्री त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. यावेळी शिवोली येथील सेंट एन्थोनी चर्चच्या समोर एका भाड्याच्या टॅक्सीतून नेपाळी लोक जात असल्याचे दिसताच ते वाहन अडवण्यात आले. वाहनात असलेल्या सर्वांची झडती घेतली असता त्यांच्या कंबरेत व छातीवर चरस गुंडाळल्याचे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून १ हजार ६२५ रुपये व एक मोबाईलही जप्त केला आहे.
गाडी चालवणाऱ्या चालकाला याविषयीची कोणताही माहिती नव्हती. त्याने थीवी रेल्वे स्थानक ते हणजूण येथे जाण्यासाठी ४०० रुपयांचे भाडे ठरवले होते. तसेच वाहनाचा चालक तपासकामाला पूर्ण सहकार्य करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सदर वाहन क्रमांक जीए ०१ झेड ६६१५ हे जप्त केले आहे. सदर छापा या पथकाचे पोलिस अधीक्षक वेणू बंसल व उपअधीक्षक रमेश म्हामल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक मिरा डि'सिल्वा, अर्जुन कोंडूसकर पोलिस शिपाई दयानंद परब, हिरमय्या गुरय्या, तुकाराम मांद्रेकर व सुरज गोवेकर यांनी सहभाग घेतला. याविषयीचा पुढील तपास महिला उपनिरीक्षक डिसिल्वा करीत आहे.
Tuesday, 1 December 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment