Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 30 November 2009

हल्ला प्रकरणी आश्पाकच्या चुलतभावाला अटक

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - आश्पाक बेंग्रे याने बिच्चू याच्यावर हल्ला करण्याचा आदेश दिल्यानंतर पैशांची बोलणी सुलेमान याने मुख्य हल्लेखोर रमेश दलवाई याच्याशी केली होती. सुलेमान हा आश्पाकचा चुलत भाऊ असून बिच्चू याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या कटात सामील असल्याचा आरोप ठेवून सुलेमान बेंग्रे (५१) याला काल रात्री पणजी पोलिसांनी अटक केली. बेती वेरे येथे राहणारा सुलेमान बेंग्रे हा व्यवसायाने दुचाकीने भाडी मारणारा "पायलट' असून आश्पाकतर्फे खंडणीचे सर्व पैसे हाच गोळा करीत होता, अशीही माहिती पोलिसांनी दिली.
न्यायालयीन कोठडी असलेल्या बेंग्रे याने बिच्चू याच्यावर हल्ला करण्याचा आदेश दिल्यानंतर सुलेमान याने रमेश दलवाई याच्याशी सतत संपर्क ठेवला होता. तर, हल्ल्याच्या आदल्या दिवशी आश्पाक बेंग्रे जुन्ता हाऊसमधे असलेल्या जलद न्यायालयात एका सुनावणीसाठी हजर राहण्यास आला असता त्याठिकाणी रमेश दलवाई आणि सुलेमान याने त्याची भेट घेतली होती. असे तपासात उघड झाल्याचे या प्रकरणाचे तपास अधिकारी संदेश चोडणकर यांनी सांगितले. सुलेमान याला आज न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे करून १३ दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे.
आश्पाक तुरुंगात पोचल्याने त्याची जागा बिच्चू याने घेतली. सर्व अनैतिक धंद्याची रक्कम बिच्चू आपल्याजवळ ठेवत असल्याची माहिती बेंग्रे पर्यंत पोचल्याने बिच्चूचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला. त्यासाठी सुलेमान आणि शाम याने तुरुंगात असलेले आश्पाकची अनेक वेळा भेट घेतल्याचे उघड झाले आहे. त्याप्रमाणे वैद्यकीय चाचणीसाठी इस्पितळात आणते वेळी, सुनावणीसाठी न्यायालयात आला असता त्या त्या ठिकाणी त्याची भेट घेऊन हल्ल्याचा कट रचण्यात आला, असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बिच्चू याच्यावर दि. २६ रोजी प्रथम वर्ग न्यायालयाच्या बाहेर हल्ला झाला, तर, दि. २५ रोजी जलद गती न्यायालयात रमेश आणि सुलेमान याने आश्पाकची भेट घेतली होती. त्याचठिकाणी "सुपारी'चा पहिला हप्ताही रमेशला देण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही रक्कम केवढी होती, त्यातील किती रक्कम आगाऊ दिली, हे अद्याप स्पष्ट होत नसल्याचे निरीक्षक चोडणकर यांनी सांगितले.

No comments: