Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 3 December 2009

न्यायालयीन कोठडीतच बेंग्रे मोबईल वापरत होता

पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती उघड
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): कुविख्यात गुंड आश्पाक बेंग्रे न्यायालयीन कोठडीत मोबाईल वापरत होता, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली असून त्यामुळे तुरुंग यंत्रणा कशी ढिसाळ व कुचकामी बनली आहे यावर झगझगीत प्रकाश पडला आहे.
अश्पाक याला पोलिस कोठडीत घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली असता ही माहिती अधिकृतरीत्या उघड झाली आहे. पोलिस महानिरीक्षक रवींद्र यादव यांनी काल सायंकाळी सुमारे दोन तास त्याची कसून चौकशी केली .
बेंग्रेने कोठडीतूनच मोबाईलद्वारे एका व्यक्तीशी संपर्क साधून बिच्चू न्यायालयात कधी येणार याची माहिती मिळवली होती. तसेच, बिच्चूचा काटा काढण्यासाठी सहा महिन्यापूर्वी "नूर' या गुंडाला सुपारी दिली होती, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांनी दिली. गुन्हेगारी विश्वात आपला दरारा कायम ठेवणे हाही या हल्ल्यामागील त्याचा उद्देश होता, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले.
'नूर'ने दगा दिला...
खून आणि दरोड्याच्या आरोपाखाली आश्पाक तुरुंगात पोचल्याने खंडणीचा धंदा "नूर' आणि "बिच्चू' सांभाळू लागले. दिवसभरात या दोघांकडे हातात खंडणीची रक्कम "जमा' होत होती. त्यावर आश्पाकचा कोणताही अधिकार उरलेला नव्हता व त्या जाणिवेने कोठडीत असलेला आश्पाक अस्वस्थ झाला होता. म्हणून सहा महिन्यांपूर्वी "नूर'ला आश्पाकने वास्को येथील न्यायालयीन कोठडीत बोलावून घेतले आणि तेव्हाच बिच्चूचा "गेम' करण्याची सुपारी त्याने त्याला दिली होती. काम फत्ते होईल, अशी हमी देऊन परतलेल्या "नूर' ने मग बिच्चूशी हातमिळवणी केली. तसेच, ठरलेला कट त्याच्यासमोर उघड करून त्याच्याकडूनही पैसे घेऊन शेजारील राज्यात तो पसार झालासुद्धा. गेल्या काही महिन्यापासून "नूर'आपला मोबाईलही घेत नाही, असे आश्पाकने पोलिसांना सांगितले आहे.
रमेशला आश्पाकचा गुरुमंत्र..
"नूर' पळाल्याची माहिती मिळाल्यावर त्याच कोठडी असलेल्या रमेश दलवाई याच्याशी आश्पाकने मैत्री केली. "गुन्हेगारी जगतात तुझे "नाव' व्हायचे असेल तर, मी सांगतो तसे कर आणि तसे केले तर खंडणीची रक्कमही जास्त मिळेल..' असा "गुरुमंत्र' देऊन बिच्चूचा भर न्यायालयाच्या बाहेर काटा काढण्याची सुपारी आश्पाकने त्याला दिली. त्यासाठी पन्नास हजार रुपयांची बोली ठरली. रमेशने त्याला होकार दिल्याने आश्पाकने बिच्चू न्यायालयात कधी येणार आहे, याची माहिती रमेशला पुरवली.
पर्यटकांची लुबाडणूक..
गुजरातहून येणाऱ्या तरुण पर्यटकांना ही टोळी लक्ष्य करीत होती. तसेच बिगर गोमंतकीय लोकांचे अपहरण करून खंडणी उकळणे, असे धंदेही सदर टोळी करीत होती. तसेच गोमेकॉ व त्या परिसरातील मुली पुरवण्याचे आमिष दाखवून पर्यटकांना हजारो रुपयांना आश्पाक आणि बिच्चूची यांची टोळी लुबाडत होती, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

No comments: