पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): पणजी जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर गुंड बिच्चू याच्यावर खुनी हल्ला करून फरार झालेल्या तिघा हल्लेखोरांना आज पणजी पोलिसांनी वास्को येथून ताब्यात घेतले, तर या हल्ल्यासाठी त्यांना मदत पुरवणाऱ्या अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे. या खुनी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार न्यायालयीन कोठडीत असलेला कुविख्यात गुंड आश्पाक बेंग्रे असून त्यानेच बिच्चू याच्यावर हल्ला करण्यासाठी "सुपारी' दिली होती, अशी माहिती आज पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी दिली. रात्री उशिरा या हल्ल्यात वापरण्यात आलेली जीए ०३ टी ३००४ ही एव्हेंजर दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. तर, या प्रकरणात रमेश गिरप्पा दलवय (वय २४, मूळ बेळगाव येथे राहणारा), महमद मजीद रेहमान (२४, मूळ कोलकाता येथे राहणारा. सध्या मडगाव), संजय मधू लिंगूडकर (वय २३,नावेली मडगाव), प्रवीण सुरेश भातखंडे (वय १९, आसगाव, मूळ खानापूर), नदीम आयूब खान (वय २४, मडगाव, मूळ दिल्ली) व शाम विनय नाईक (२७, कंापाल पणजी) या सहा जणांना भा.द.स ३०७ व १२३ (ब) कलमाखाली अटक करण्यात आली आहे. तर, न्यायालयात अर्ज सादर करून न्यायालयीन कोठडीत असलेल्या आश्पाक बेंग्रे याला या हल्ला प्रकरणात पोलिस कोठडीत घेण्यात येणार असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले.
बिच्चू याच्यावर हल्ला करण्यापूर्वी रमेश आणि मोहमद हे दोघे न्यायालयाच्या दारावर उभा असलेल्या आश्पाक बेंग्रे याच्याकडे बोलत होते. बिच्चू एका प्रकरणात न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांच्याकडे होती. त्याच्यावर हल्ला करायचा आणि त्यानंतर होणाऱ्या गोंधळाची संधी घेऊन फरार व्हायचे, असे दोन हेतू साध्य करणाच्या बेत बेंग्रे याचा होता. या हल्ल्यात वापरण्यात आलेली एव्हेंजर ही दुचाकी १ नोव्हेंबर रोजी हणजूण येथून प्रवीण भातखंडे यांनी चोरली होती. तर, सर्वांची एकाच ठिकाणी राहण्याची सोय शाम नाईक याने केली होती. त्यासाठी वास्को येथे शाम याने एक भाड्याची खोली घेतली होती. तेथूनच रमेश, महोमद, नदीम, प्रवीण संजय व शाम याला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खंडणी प्रकरणातून हल्ला...
एकेकाळी गुन्हेगारी जगात अधिकार गाजवणारा आश्पाक बेंग्रे तुरुंगात असल्याने त्याला का म्हणून खंडणी द्यायची, असा विचार करून त्याच्याच गॅंगमधे काम करणारा बिच्चू याने काही महिन्यांपासून वेगळी चूल थाटली होती. बेंग्रे कोठडीत असल्याने गुन्हेगारी जगतावर त्याची पकडही ढिली झाली होती. त्यामुळे बिच्चू याने बेंग्रे याला त्याचा हप्ता देण्याचे बंद केले होते. बिच्चू याने गुन्हेगारी जगतात आपली पकड मजबूत केलीच. त्यामुळे बिच्चू याच्यावर प्राणघातक हल्ला करणाचा कट रचण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा कट न्यायालयीन कोठडीतून रचण्यात आल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. तुरुंगात असलेल्या संशयितांना किंवा आरोपींना कोण कोण भेटायला येतात यावर कडक लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे श्री. देशपांडे म्हणाले.
हल्लेखोर वास्कोतून 'ट्रिप्पल सीट' आले
बिच्चू याच्यावर हल्ला करण्यासाठी हल्लेखोर वास्कोतून दुचाकीवरून ट्रीप्पल सीट आले होते. आश्चर्याची बाब म्हणजे वास्को ते पणजीपर्यंत त्यांना कोणत्याही वाहतूक पोलिसाने अडवले नाही. येताना त्यांनी दोन चॉपर बॅगेतून आणले होते. दुचाकी संजय लिंगुडकर चालवत होता. तर, पहिला बिच्चूवर पहिला वार रमेश याने केला. हा वार बिच्चूने आपल्या हातावर झेलला तेव्हा रमेश याच्या हातातला चॉपर खाली पडला. हा चॉपर काढून रमेश याच्यावर हल्ला करण्यासाठी बिच्चू खाली वाकला असता दुसऱ्या चॉपरने त्याच्यावर वार करण्यात आला. हा वार त्याच्या डोक्यावर लागला. त्याबरोबर तो खाली कोसळला. तेव्हा पळून जात असताना एक चॉपर घटनास्थळी पडला. तर, दुसरा चॉपर रमेश याच्याकडून जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याविषयीचा पुढील तपास पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर करीत आहेत.
----------------------------------------------------------------------
तुरुंगात शिजला हल्ल्याचा कट...
न्यायालयीन कोठडीत असलेल्या आश्पाक बेंग्रे याने बिच्चू याच्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली होती, अशी माहिती उघडकीस आली आहे. त्यासाठी बेळगाव येथील रमेश आणि मूळ कोलकाता येथील मोहमद याची मदत घेण्याचा आली. बेंग्रे याचा उजवा हात समजला जाणारा शाम नाईक याने कट पूर्णत्वास नेण्यासाठी मदत केली असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
-----------------------------------------------------------------------
व्हिडिओ कॉन्फरसिंग सुनावणी हवी
सुपारी देऊन हल्ला करणे हे गोव्यात नवीन नाही. अनेक वर्षापासून हे चालत आले आहे. गरज आहे ती, अशा अट्टल गुन्हेगारावर लक्ष केंद्रित करण्याची, असे मत पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी व्यक्त केले. अंडरट्रायल असलेल्या संशयितांना न्यायालयात आणण्याची पद्धत बंद केली पाहिजे. प्रत्येक सुनावणीच्या वेळी या गुन्हेगारांना न्यायालयात आणावे लागते त्याचा गैरफायदा ते उठवतात. त्याचप्रमाणे, एका गुन्हेगाराला न्यायालयात आणण्यासाठी चार पोलिसांना पाठवावे लागते. हा अतिरिक्त बोजा पोलिसांवर पडतो. त्यामुळे तुरुंग ते न्यायालय अशी व्हिडिओ कॉंन्फरन्सिंगची सुविधा सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे यावेळी श्री. देशपांडे म्हणाले.
Saturday, 28 November 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment