भारतीय सिनेमा विश्वचित्रपट उद्योगावर अधिराज्य गाजवेल
दाक्षिणात्य सुपरस्टार मम्मुटी यांचा दृढ विश्वास
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): यंदाच्या इफ्फीतस्पर्धात्मक विभागामध्ये "आय कांट लिव्ह विदाऊट यू' या तैवानच्या चित्रपटाला प्रतिष्ठेचा सुवर्णमयूर प्राप्त झाला. सुवर्णमयूर स्मृतिचिन्ह व रोख चाळीस लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक लियोन दाय यांनी व त्यांचे सहकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. उत्कृष्ट दिग्दर्शकासाठी असलेला रौप्यमयूर पुरस्कार "ए बॅ्रड न्यू लाइफ'या दक्षिण कोरिया तथा फ्रान्सची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक ऑनी लेकॉंत यांना प्राप्त झाला. स्पेशल ज्युरी ऍवॉर्ड (विशेष परीक्षक मंडळ पुरस्कार) जॉर्ज ओव्हाशिवली यांना "द अदर बॅंक" या चित्रपटासाठी मिळाला. रौप्यमयूर व १५ लाख रुपये रोख असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. याप्रसंगी परीक्षक मंडळाचे अध्यक्ष जुवांव बातीस्ता दे आंद्रादे यांच्यासह केनिची ओकोबू,जीन मायकल फ्रोडन, सारिका व वीक सरीन उपस्थित होते. यंदा स्पर्धात्मक विभागात एकूण १५ चित्रपटांचा समावेश होता व त्यात "अग्शुमनेर चौबी'(बंगाली) व गाभ्रीचा पाऊस (मराठी) हे दोन भारतीय चित्रपटही होते. केंद्रीय मंत्री एस.जगतरक्षक, अभिनेते मम्मुटी व राज्यपाल डॉ.सिद्धू यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
भारतीय सिनेमाची डौलदार वाटचाल पाहता आगामी काळात भारतीय सिनेमा जागतिक सिनेमा उद्योगावर अधिराज्य गाजवेल यात शंकाच नाही, असा दृढ विश्वास सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते मम्मुटी यांनी व्यक्त केला.सिनेमा हा मानवी भावनांचा आविष्कार आहे. "इफ्फी'च्या निमित्ताने जगभरातील मानवी स्वभावांच्या विविध पैलूंचे विविध चित्रपटांतून दर्शन घडते,असेही ते म्हणाले.
चाळीसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.याप्रसंगी राज्यपाल डॉ.एस. एस. सिद्धू, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री एस.जगदरक्षक , मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती प्रतापसिंग राणे, केंद्रीय चित्रपट महोत्सव संचालक एस. एम. खान,अभिनेते जॅकी श्रॉफ, अभिनेत्री रती अग्निहोत्री व अनेक महनीय व्यक्ती हजर होत्या.
मम्मुटी म्हणाले, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या महोत्सवाला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून आयोजकांनी आपल्या गेल्या २८ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीचा यथोचित बहुमान केला आहे.भारतीय चित्रपटाचा दर्जा सुधारत असून त्यामुळे "ऑस्कर' पुरस्कारापेक्षा अशा चित्रपट महोत्सवातून होणारा सन्मान महत्त्वाचा ठरतो, असे आपले वैयक्तिक मत आहे. मात्र "ऑस्कर'ला आपण अजिबात कमी लेखत नाही..
एस.जगतरक्षक यांनी "इफ्फी' च्या आयोजनाचे कौतुक केले. हा महोत्सव वर्षानुवर्षे बहरत जाईल,असेही ते म्हणाले.
गोव्यात आता आंतरराष्ट्रीय दर्जाची "फिल्म सिटी' उभारणे गरजेचे बनले आहे.या "फिल्म सिटी'मुळे खऱ्या अर्थाने इथे आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या चित्रीकरणांना वाव मिळेल. शिवाय त्यामुळे स्थानिक चित्रपट उद्योगालाही नवी भरारी मिळेल, असे राज्यपाल डॉ.सिद्धु म्हणाले.
इफ्फीच्या यशस्वितेबद्दल केंद्रीय चित्रपट महोत्सव संचालनालय व गोवा मनोरंजन संस्थेच्या सर्व सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.यंदा पहिल्यांदाच या महोत्सवासाठी "इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी' ची निवड केली नाही व ही जबाबदारी सर्वांनी यथोचितपणे उचलली, अशी माहिती त्यांनी दिली."इफ्फी'अंतर्गत आयोजित केलेल्या विविध स्पर्धांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला."टी-ट्वेंटी ऑफ इंडियन सिनेमा' ही अनोखी स्पर्धाही या महोत्सवाचे खास आकर्षण ठरली,असेही कामत म्हणाले.
गोवा मनोरंजन संस्थेच्या क्रिएटिव्ह कमिटीच्या अध्यक्ष अंजू तिंबले व रेड कार्पेट कमिटीचे अध्यक्ष आमदार बाबू कवळेकर यांच्या कामाचाही त्यांनी गौरव केला.गोवा चेंबर ऑफ कॉमर्स, पणजी महानगरपालिका तसेच इतर सर्व संबंधित संस्थांनी हा इफ्फी यशस्वी होण्यासाठी दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.
यंदाच्या महोत्सवात मोठ्या प्रमाणात गोमंतकीय चित्रपट प्रदर्शित झाले यावरून राज्यात चित्रपट संस्कृती रुजत असल्याचे द्योतक आहे, असे ते म्हणाले. समारोपाचे सूत्रसंचालन सायली भगत व रोहित रॉय यांनी केले. एस. एम. खान यांनी आभार प्रकट केले.
------------------------------------------------------------------
मंत्री व आमदार गैरहजर
या समारोप सोहळ्यालाही सरकारातील मंत्री व आमदारांची गैरहजेरी जाणवली. साहजिकच तो पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. सांताक्रुझच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस (मामी) मात्र चांगली भरजरी साडी परिधान करून उपस्थित होत्या; तर "रेड कार्पेट'चे अध्यक्ष आमदार बाबू कवळेकर हजर होते. विरोक्षी आमदारांनीही या सोहळ्याकडे पाठच फिरवली होती. काही अपवाद वगळता बहुतेक मंत्री व आमदार फिरकलेही नाहीत.
Friday, 4 December 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment