पंधरवडा उलटला तरीही एक पैसा नाही!
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) : गोवा व महाराष्ट्रातील किनारी भागाला झोडपून काढलेल्या "फयान' वादळात राज्यातील मच्छीमार बोटींवरील ६७ बेपत्ता खलाशांचा पत्ता तर लागला नाहीच परंतु या बेपत्ता खलाशांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या सानुग्रह आर्थिक मदतीचा एकही पैसा अद्याप मिळाला नसल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची जाहीर केलेली मदत ही केवळ या गरीब मच्छीमार बांधवांच्या कुटुंबीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार होता की काय, असा सनसनाटी आरोप विरोधी भाजपने केला आहे.
गेल्या ११ नोव्हेंबर रोजी गोवा व महाराष्ट्रातील किनारी भागाला "फयान' वादळाने झोडपून काढले होते. महाराष्ट्रातील कोकण भागाप्रमाणे गोव्याच्या किनारी भागालाही या वादळाचा फटका बसला. या वादळात सर्वांत मोठे नुकसान मच्छीमारांना झाले. राज्यातील अशा नैसर्गिक आपत्तीत एकाच वेळी ६७ मच्छीमार बेपत्ता होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना होती. मच्छीमार खाते व वेधशाळा यांच्यातील सुसंवादाच्या अभावामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडल्याचा आरोप यापूर्वी भाजपने केला होता. दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी मच्छीमारमंत्री ज्योकीम आलेमाव, महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा व आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्या समवेत खास पत्रकार परिषद घेतली व बेपत्ता मच्छीमारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपये सानुग्रह आर्थिक मदतही जाहीर केली. तात्काळ मदत म्हणून त्यांना सुरुवातीला ५० हजार रुपये देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बेती येथील मांडवी मच्छीमार सोसायटीकडून ३८ व कुठबंण मच्छीमार सोसायटीकडून २९ अशा पद्धतीने मच्छीमार खात्याकडे एकूण ६७ बेपत्ता मच्छीमारांची यादी पाठवण्यात आली. ही यादी सरकारला सुपूर्द करून आता पंधरवडा उलटला तरी या बिचाऱ्या बेपत्ता खलाशांच्या कुटुंबीयांच्या हातात अद्याप एकही पैसा मिळालेला नाही. सोसायटीकडून या मदतीचा पाठपुरावा सातत्याने सुरू आहे पण मुख्यमंत्री साहाय्य निधीत अपुरा पैसा असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे उत्तर मच्छीमार खात्याकडून देण्यात येत असल्याची माहिती मांडवी सोसायटीचे अध्यक्ष मेनिनो अफोन्सो व कुठबंण सोसायटीचे अध्यक्ष पेट्रीक डिसिल्वा यांनी दिली. या बेपत्ता खलाशांचे कुटुंबीय बिचारे मदतीसाठी हेलपाटे घालीत आहेत पण त्यांना नेमके काय सांगावे अशी चिंता निर्माण झाल्याची माहिती यावेळी श्री.आफोन्सो यांनी दिली.
नुकसानीचाही अहवाल अद्याप तयार नाही
दरम्यान,या वादळात मच्छीमार व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबतचा अहवाल तयार करण्याचे काम मच्छीमार खाते व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते पण याबाबतीत काहीच हालचाली झाल्या नसल्याची माहिती सोसासटींकडून देण्यात आली.जिथे बेपत्ता खलाश्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत तिथे मच्छीमार व्यावसायिकांना सरकार कशी मदत करणार,असा सवालही यावेळी पुसण्यात आला.
मानवतेला काळिमा फासणाराच प्रकार
गोव्यातील मच्छीमार व्यावसायिकांकडे कामाला असलेल्या सुमारे ६७ खलाश्यांचा वादळात सापडून मृत्यू होतो व आता पंधरवडा उलटला तरी त्यांच्या कुटुंबीयांना साधा एक पैसाही मिळत नाही ही अत्यंत शरमेची गोष्ट आहेच पण त्याहूनही मानवतेला काळिमा फासणारा हा प्रकार असल्याची टीका भाजपने केली आहे. हे खलाशी गोमंतकीय नाहीत हे जरी खरे असले तरी ते भारतीय आहेत व विशेष म्हणजे गोव्यातील मच्छीमार व्यावसायिकांचा व्यवसाय या मच्छीमारांवरच अवलंबून आहे,असेही यावेळी सांगण्यात आले. मुळातच ही जीवितहानी घडण्यास वेधशाळा व मच्छीमार खात्याची बेपर्वाई कारणीभूत आहेच. मुख्यमंत्री कामत यांनी मोठ्या दिमाखात सानुग्रह मदत घोषित केली पण तो केवळ एक फुसका बार ठरला. नैसर्गिक आपत्तीत बळी गेलेल्या खलाश्यांबाबत सरकारची ही कृती म्हणजे या मच्छीमार बांधवांच्या कुटुंबीयांची केलेली थट्टाच असल्याचा आरोपही यावेळी भाजपने केला आहे.
Friday, 4 December 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment