Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 3 December 2009

रेणुका चौधरी यांचे कार्यालय जाळले

हैदराबाद,दि. २ : वेगळ्या तेलंगणा राज्याच्या मागणीसाठी आंध्र प्रदेशात आंदोलन करणाऱ्या तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी यांच्या कार्यालयावर हल्ला करून आग लावली. हैदराबादपासून २०० किमी अंतरावर खम्माम येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. कार्यालयाचे दार आणि खिडक्या फुटल्या असून टीआरएसच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल टाकून कार्यालय जाळल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. तेलंगणा राष्ट्र समिती वेगळ्या तेलंगणा राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. कार्यालयाला आग लावल्यानंतर कार्यकर्ते पळून गेले असून सुरक्षा अधिकाऱ्यांनी आगवर नियंत्रण मिळवले आहे.
तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्या अटकेचा निषेधात हा हल्ला करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. आमरण उपोषणासाठी बसलेले राव यांना पोलिसांनी रविवारी अटक करून १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. मात्र राव यांनी खम्माम येथील जेलमध्येही उपोषण सुरु ठेवले होते. नंतर राव यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेही त्यांनी उपोषण सुरुच ठेवले आहेत. कॉंग्रेसच्या माजी खासदार रेणुका चौधरी या वेगळ्या तेलंगणाच्या मागणीच्या विरोधात आहेत.

No comments: