Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 2 December 2009

देशात महागाई शिगेला संसदेत केंद्राची प्रथमच कबुली

नवी दिल्ली, दि. १ : जीवनावश्यक वस्तूंचे वाढते भाव हा चिंतेचा विषय असून, या महागाईने सर्वसामान्यांना सर्वाधिक झळ पोहोचते आहे, अशी कबुली देतानाच केंद्र सरकारने महागाई आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.
आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी हे आश्वासन दिले. ते म्हणाले की, महागाईचा मुद्दा चिंताजनकच आहे आणि त्यामुळे सर्वाधिक त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. ही स्थिती डाळी, साखर आणि खाद्यतेल यांच्या टंचाईमुळे निर्माण झाली आहे. महागाई नियंत्रणात आणायची असेल तर खाद्यान्नांच्या सार्वजनिक वितरणाकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. डाळींचे उत्पादन फारच थोड्या देशांमध्ये होते. त्यात पाकिस्तान, बांगलादेशसारख्या देशांचा समावेश आहे. त्यांच्याकडे उत्पादित डाळींपैकी बहुतांश खप तेथेच होतो. त्यामुळे अन्य देशांना ती निर्यात करण्यासाठी वाव राहात नाही. साखरेची उपलब्धता १६ दशलक्ष टनांची आहे. पण, मागणी २३ दशलक्ष टनांची आहे. अशीच काहीशी स्थिती खाद्यतेलाबाबतही आहे. महागाई कमी करायची असेल तर या सर्व वस्तूंच्या सार्वजनिक वितरणाकडे लक्ष पुरविले पाहिजे, असेही मुखर्जी म्हणाले.
प्रणवदा चिडतात तेव्हा...
राज्यसभेत प्रणव मुखर्जी महागाईच्या मुद्यावर बोलत असतानाच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वृंदा करात यांनी त्यांच्या बोलण्यात अडथळे आणले. या प्रकाराने मुखर्जी यांचा पारा चढला आणि त्यांची वृंदा करात यांच्याशी शाब्दिक चकमक उडाली. राज्यसभेत प्रणवदा पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते. मुद्दा महागाईचा असल्याने ते विश्लेषण करून सांगत होते. साखरेची मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्याचे त्यांनी म्हणताच वृंदा करात यांनी प्रणवदांच्या बोलण्यात हस्तक्षेप केला. सरकार साखरेचा पुरवठा करण्यासाठी काय करीत आहे, अशी विचारणा केली.
मी उत्तर देत असलेला प्रश्न तुम्ही विचारलेला नाही. अशा स्थितीत तुम्ही हस्तक्षेप करू नका, असे मुखर्जी यांनी करात यांना ठणकाविले. तरीही डाव्या पक्षाचे सदस्य उभे राहून बोलू लागले. या प्रकाराने मुखर्जी चिडले आणि जागेवर बसले. माकप सदस्य करीत असलेला प्रकार बेशिस्तीचा असून अशा वातावरणात मी उत्तर देणार नाही, असेही त्यांनी ठणकाविले. त्यांनी वृंदा करात आणि सीताराम येचुरी यांना शिस्तीचे धडेही दिले. या प्रकाराने सभागृहातील वातावरण काही वेळासाठी तापले होते.

No comments: