राजेंद्र देसाई
२००४ सालापासून गोव्यात सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दरवर्षी अनेक प्रादेशिक चित्रपट दाखवले गेले. यातील अनेक चित्रपट कायम स्मरणात राहण्यासारखे होते. खास करून दक्षिणेतील तामीळ, तेलगू, मल्याळी, कानडी, मराठी तसेच उत्तरेतील बंगाली, आसामी चित्रपटांनी आपल्या सक्षम निर्मितीचा आणि सर्जनशीलतेचा अनुभव इफ्फीतील प्रेक्षकांना दिला. मात्र या इतक्या वर्षात एकाही कोकणी चित्रपटाचा त्या तोडीने इफ्फीत प्रभाव पडू शकला नाही. आमदार दामू नाईक यांच्या "जागोर' या चित्रपटाने यंदा ही उणीव भरून काढली. केवळ उणीवच भरून काढली नाही तर अनेक चांगल्या प्रादेशिक चित्रपटांच्या तोडीस तोड हा चित्रपट तयार झाला. उत्कृष्ट पटकथा, कल्पक आणि दमदार दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनय, दर्जेदार फोटोग्राफी (सिनेमॅटोग्राफी), आणि अगदी योग्य अशा लोकेशन्सचा शुटिंगसाठी वापर यामुळे मराठी किंवा अन्य कोणत्याही भाषेतील चित्रपटांइतका दर्जेदार असा हा चित्रपट निर्माण झाला. आयनॉक्स १ मध्ये प्रेक्षकांच्या भरगच्च उपस्थितीत झालेल्या या चित्रपटाच्या प्रिमियर शो ला प्रेक्षकांकडून दामू व इतरांना मिळालेली उत्स्फूर्त दाद चित्रपटाचे यश अधोरेखित करून गेली. खास करून या चित्रपटाचा नायक वर्धन कामत या तरुणाच्या अभिनयाने चित्रपटाला वेगळी ओळख आणि उंची मिळवून दिली. अर्थात इतर कलाकारांनाही त्याचे श्रेय द्यावे लागेल.
"दामबाबाचे घोडे' या प्रॉडक्शन हाउसद्वारे दामू नाईक यांनी निर्माण केलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत संग्रामसिंग गायकवाड. गायकवाड यांनी चित्रपटाच्या विषयाला पूर्ण न्याय देताना चित्रपटाच्या इतर बाजूही इतक्या सुरेखपणे सांभाळल्या आहेत की, चित्रपट जसजसा पुढे जातो तसा तसा तो अधिक परिपक्व वाटत जातो. पैशांच्या मागे धावणारे लोक बहुराष्ट्रीय कंपन्यांना, बिगरगोमंतकीय धनिकांना जमिनी लाटतात आणि स्वतः आपल्या गावातून आणि घरातून कसे हद्दपार होतात, विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची होणारी नासधूस लोकांच्या मुळावर कशी उठली आहे आणि सेझ व इतर गोष्टींसाठी लाखो चौरस मीटर जमिनी धनिकांना लाटण्याचे कसे षड्यंत्र रचले जात आहे, याचे सचित्र चित्रण कथानकाच्या माध्यमातून पुढे जात राहते. शेती, बागायती टिकल्या तरच लोक टिकतील आणि तरच गोवा टिकेल हा सशक्त संदेश देताना सामूहिक शेतीची संकल्पना जागोरमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांच्या डोक्यातील ही कल्पना दामू यांनी चित्रपटासाठी यशस्वीपणे वापरून दाखवली, हा त्यातला सकारात्मक भाग आहे. एका लग्नसमारंभाच्या निमित्ताने पर्रीकर, श्याम सातार्डेकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, नीळकंठ हळर्णकर यांचे दर्शन चित्रपटात घडते. हा प्रसंग मोठा सुरेखपणे चित्रित करण्यात आला आहे.
चित्रपटाची आणखी जमेची बाजू ठरली आहे ती शर्मद रायतूरकर यांची फोटोग्राफी. बॉलिवूडमध्ये सिनेमॅटोग्रापर म्हणून करियर करणारे शर्मद "कोई मिल गया' या चित्रपटाचा सहफोटोग्राफर म्हणून जबाबदारी पेलल्यानंतर अचानकपणे कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी गोव्यात परतले आणि येथेच अडकून पडले. परंतु त्यांच्यातील आर्टिस्ट त्यांना स्वस्थ बसू देईना. दरम्यानच्या काळात आपला छंद पूर्ण करण्यासाठी ते अनेक उपक्रम करत होतेच परंतु "जागोर' ने त्यांना एक नवी दिशा आणि नवा मार्ग निश्चितपणे दाखवला असेल. गोव्यात आज त्या तोडीचा सिनेमॅटोग्राफर सापडणे कठीण त्यामुळे आगामी काळात गोव्याला त्यांच्या या टेलंटचा चांगलाच उपयोग होणार हे निश्चित. चित्रपटाची गाणी स्वतःच दामू यांनी लिहिली आहेत. ती इतकी सुरेख आहेत की दामू हे गीतकार कधीपासून झाले असा प्रश्न पडावा. खास करून चित्रपटातील भक्तिगीते आणि टायटल गीत अप्रतिम म्हणण्याइतके चांगले आहे. अर्थात सिद्धनाथ बुयांव यांचे संगीत हा चित्रपटाची खरी ताकद बनली आहे. हे संगीत मराठीतील कोणत्याही दर्जेदार संगीताच्या तोडीचेच नव्हे तर अधिक परिपक्व आणि प्रसंगांशी अनुरूप आहे. या तरुण संगीतकारालाही या क्षेत्रात चांगले भवितव्य आहे हे निश्चित. त्यामुळे सगळ्याच आघाड्यांवर समतोल राखलेला हा चित्रपट आजवरच्या गोमंतकीय चित्रपटात चांगलाच सरस ठरला आहे. गोव्याच्या भवितव्याची चिंता असलेल्या सर्वांनीच पाहावा असा हा चित्रपट आहे. स्वतः दामू नाईक यांची कथा व एन. शिवदास यांचे संवाद चित्रपटाला लाभले आहेत. कथा तर सुंदर आहेच परंतु शिवदास यांचे संवादही तोडीस तोड आहेत.
Wednesday, 2 December 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment