Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 3 December 2009

माशेलात चार मंदिरे फोडली तीन लाखांचा ऐवज लंपास


माशेल, दि. २ (प्रतिनिधी): माशेल येथील प्रसिद्ध चार मंदिरे चोरट्यांनी फोडून सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लांबविला. मंगळवारी रात्री पोलिस चौकीच्या २५ मीटर अंतराच्या परिसरातील श्रीशांतादुर्गा वेर्लेकरीण, श्री लक्ष्मी रवळनाथ, श्री गजांतलक्ष्मी व अत्री गोत्री पुरुष मंदिर अशी चार मंदिरांच्या दरवाजांची कुलुपे तोडण्यात आली. चारही मंदिरांच्या दरवाजांची कुलुपे एकाच पद्धतीने तोडण्यात आली. यात श्री गजांत लक्ष्मी मंदिरातील देवीचे सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची उत्सवमूर्ती व छत्री असा सुमारे अडीच लाख रुपयांचा तर पुरुष मंदिरातील रुप्याची प्रभावळ, चांदीचे दोन मुखवटे व छत्री असा सुमारे ६० हजारांचा ऐवज चोरण्यात आला.
एकाच वेळी एकाच परिसरातील मंदिरे फोडण्याची माशेलमधील ही पहिलीच घटना आहे. श्री वेर्लेकरीण मंदिरांची काही कुलुपे तोडून आत जाण्यापलीकडे चोरटे काही करू शकले नाहीत. गर्भकुडीच्या दरवाजाची कुलूप व्यवस्था आतून चांगली असल्यामुळे बाहेर असलेल्या टेबलाच्या खणातील चोरट्यांनी अंदाजे ५०० ते ६०० रुपये लांबविले तर श्री लक्ष्मी रवळनाथ मंदिराची कुलूप व्यवस्था चोख असल्यामुळे चोरट्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.
यापूर्वी याच देवस्थानच्या मागे असलेल्या नीलेश शिरोडकर यांच्या कालिका ज्वेलर्स या सोन्याचांदीच्या दुकानावर भरदिवसा दरोडा घालण्यात आला होता. श्री. शिरोडकर यांच्या प्रसंगावधानामुळे त्यावेळी तो दरोडा फसला होता. तद्नंतर माशेल - खांडोळा परिसरात लहान - सहान चोरीच्या घटना घडल्या होत्या. या सर्व घटनांत परप्रांतीय कामगार लोकांचा संशय ग्रामस्थांना येत असून माशेल परिसरातील परप्रांतीय कामगार लोकांची पोलिसांनी कडक तपासणी करावी, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच लवकरात लवकर पोलिस स्थानक व्हावे, अशी अपेक्षा करीत आहेत.
चारही मंदिरांचे पुरोहित आज (बुधवार) सकाळी नित्य पूजेसाठी मंदिराकडे आल्यानंतर त्यांना दरवाजांची कुलुपे तोडण्यात आल्याची दिसली. तात्काळ त्यांनी आपआपल्या देवस्थान समितीला याबद्दल कळविल्यानंतर समितीतर्फे रीतसर फोंडा पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली. फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पोलिस पथकासह घटना स्थळांना भेट देऊन पंचनामा केला. यावेळी त्यांनी आणलेल्या गुन्हा शोधक कुत्र्यांचा उपयोग झाला नाही. पुढील तपास फोंडा पोलिस करीत आहेत.

No comments: