Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 5 December 2009

बिबट्याचा डिचोलीत हल्ला: दोन जखमी

डिचोली, दि. ४ (प्रतिनिधी): डिचोली परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ माजवला असून, आज सकाळी वन गावकरवाडा येथील लक्ष्मी तुळशीदास गावकर व राजु कुंंदनवार यांच्यावर हल्ला करून हा बिबटा जंगलात पसार झाल्यामुळे एकच खळबळ माजली.
लक्ष्मी गावकर ही महिला आज सकाळी आपल्या घरात काम करीत असताना बिबट्याने तिच्यावर मागून मानेवर हल्ला चढवला, यावेळी गडबड होताच बिबटा बाजूच्या झुडपात लपला. याबद्दलची माहिती प्राणीमित्र अमृतसिंग यांनी पशू बचाव पथकाला कळविली, हे पथक लगेच दाखल झाले, त्यावेळी त्यातील राजू कुंदनवार याच्यावर बिबट्याने हल्ला करून त्याने जंगलात धूम ठोकली.
लक्ष्मी व राजू यांना "१०८'वाहनाने डिचोली आरोग्य केंद्रात आणण्यात आले. लक्ष्मी हिच्या जखमांची तीव्रता लक्षात घेऊन म्हापसा येथे आझिलो इस्पितळात हलविण्यात आले, तर प्राथमिक उपचारानंतर राजू यांना घरी जाऊ देण्यात आले.
डिचोली परिसरात सध्या खाण विस्ताराचे प्रमाण वाढत चालले असून वनक्षेत्राचे सपाणीकरण सुरू झाल्याने प्राण्यांच्या निवासी जागांवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळेच बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणी आता थेट लोकवस्तीत येत आहेत. गेल्या चार वर्षांत डिचोलीत तीन बिबट्यांना सापळा लावून पकडण्यात आले तर एकाने पिंजरा तोडून पलायन केले होते. बिबट्यांचा वाढता संचार ही डिचोलीवासीयांसाठी एक मोठी समस्या ठरली आहे.

No comments: