Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 29 November 2009

लतादीदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान जाहीर

मुंबई, दि. २८ : गानकोकिळा लता मंगेशकर यांना फ्रान्स सरकारने "ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर' हा सन्मान बहाल करण्याचे जाहीर केले असून २ डिसेंबर रोजी हा समारंभपूर्वक दिला जाणार आहे.
भारतातील फ्रान्सचे राजदूत जेरोम बोनाफॉनते यांनी ही माहिती दिली. संगीत जगतातील लतादीदींचे योगदान लक्षात घेऊन त्यांना हा सन्मान दिला जात आहे. फ्रान्सने नेहमीच कला आणि कलावंतांचा सन्मान केला आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजाचे केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगात चाहते आहेत. गेल्या ६० वर्षांपासून त्यांनी आपले स्थान अढळ ठेवले आहे.
२ डिसेंबरपासून भारतात सुरू होणाऱ्या फ्रेंच चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात दीदींना हा सन्मान दिला जाणार आहे. लता मंगेशकर यांच्यापूर्वी सत्यजीत रे आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांना फ्रान्स सरकारने या सर्वोच्च सन्मानाने गौरविले आहे. हा फ्रान्स सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. याची सुरुवात नेपोलियन बोनापार्टने १८०२ मध्ये केली होती. हा सन्मान फ्रेंच नागरिक किंवा विदेशी कलावंतांना दिला जातो.

No comments: