'आठवणीतले बोरकर' कार्यक्रमातील सूर
पणजी, दि. ३० (सांस्कृतिक प्रतिनिधी): कविवर्य बा. भ. बोरकर जितके भावनाप्रधान होते तितकेच ते व्यावहारिक होते. कुटुंबात दहा सदस्य असलेल्या संसाराचा गाडा यशस्वीपणे सांभाळत त्यांनी आपल्या आवडी जोपासल्या. ते जेवढे कवितेवर प्रेम करायचे तितकेच प्रेम ते आपल्या कुटुंबावरही करायचे. "बोरकर सगळ्यांतच होते पण ते कशातही नव्हते', असे प्रातिनिधिक भावनोद्गार "आठवणीतले बोरकर' (स्मरणांजली) या कार्यक्रमात निघाले.
कला आणि संस्कृती संचालनालय व कै. बा. भ. बोरकर जन्मशताब्दी कार्यक्रम समिती आयोजित कै. बा. भ. बोरकर जन्मशताब्दी उद्घाटन सोहळ्यातील दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाकीबाबांच्या सहवासातील आठवणी कथन करण्यासाठी व्यासपीठावर नागेश करमली, श्रीराम कामत, हिरालाल कामत व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधव बोरकर उपस्थित होते.
सुरुवातीला बोरकरांच्या ९९ व्या जयंतीदिनानिमित्त एक मिनिट स्तब्धता पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली व त्यांच्या प्रतिमेला कार्यक्रम समितीचे उपाध्यक्ष दत्ता नायक यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.
विद्यार्थी दशेत असताना बोरकरांचा सहवास आपल्याला लाभला. ते शिक्षकापेक्षा कवीच अधिक वाटायचे; दर दिवशी वर्गात ते आम्हांला आपली कविता वाचून दाखवायचे आणि कित्येकवेळा शाळेचे वेळापत्रक बदलून जायचे, असा सुरम्य आठवणी यावेळी नागेश करमली यांनी जागवल्या. दुःखातही सुख मानणारे बाकीबाब सगळ्यांच गोष्टींत समरस होऊन जात असेही ते पुढे म्हणाले.
मनापासून स्वीकारलेल्या तत्त्वप्रणाली बोरकरांनी कधीही सोडल्या नाहीत, आर्थिक अडचणीत असतानाही त्यांनी आपला स्वाभिमान जोपासला, सरकारकडून चालून आलेल्या सवलती त्यांनी परतवून लावल्या, गरज असतानाही मोहाला आळा घातला, असे यावेळी बोलताना श्रीराम कामत यांनी सांगितले.
हिरालाल कामत यांनी बोरकरांकडून त्यांना मिळालेल्या प्रेमाचे सोदाहरण कथन केले. बाकीबाबांच्या आठवणी पुस्तक स्वरूपात आल्यास आजच्या पिढीसाठी ते अतिशय उद्बोधक ठरेल असे अध्यक्षस्थानावरून बोलताना माधव बोरकर म्हणाले.
याच कार्यक्रमाला जोडून "बा. भ. बोरकरांची कविता' या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यात डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी "बोरकरांच्या कवितांतील निसर्गानुभूती' तर नरेंद्र बोडके यांनी "बोरकरांच्या कवितेवरील पाश्चात्त्य कवींचा प्रभाव' या विषयावर निबंधवाचन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुंडलीक नाईक यांनी भूषविले.
Tuesday, 1 December 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment