सावर्डे, दि. ४ (प्रतिनिधी ) : सावर्डे धडे येथे खनिज ट्रक व मारुती व्हॅन यांच्यात झालेल्या भीषण अपघात सुनापरान्तचे सावर्डे प्रतिनिधी आनंद मंगेश नाईक हे गंभीर जखमी झाले. त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. आनंद मंगेश नाईक आपल्या जीए-०९-ए-५५५९ क्रमांकाच्या मारुती व्हॅनने दाबाळहून सावर्डेच्या दिशेने चालले होत तर जीए-०९-यू-५९४४ क्रमांकाचा ट्रक सावर्ड्याहून दाबाळच्या दिशेने जात होता. धडे येथील वळणावर ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ट्रकची जोरदार धडक समोरून येणाऱ्या व्हॅनला बसली. धडक इतकी जोरदार होती की व्हॅनच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला व गाडी रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. यावेळी जवळपास असलेल्या नागरिकांनी त्वरित धाव घेतली. आनंद मंगेश नाईक यांना रक्तबंबाळ अवस्थेत गेट्सच्या साह्याने प्रथम कुडचडे आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांची परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना ताबडतोब गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले.
बांबोळी येथील डॉक्टरांनी त्यांच्या हातापायाला जबर दुखापत झाल्याचे सांगून पायाच्या हाडाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती दिली. याशिवाय त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली असून गाडीच्या काचांमुळे चेहऱ्याला जखमा झाल्या आहेत. संध्याकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच सावर्डे भागातील नागरिक तसेच पत्रकारांनी बांबोळी येथील इस्पितळाकडे धाव घेतली. सदर अपघाताची माहिती मिळताच कुडचडे पोलिस स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून पुढील तपास कुडचडे पोलिस स्थानकाचे निरीक्षक नीलेश राणे करीत आहेत.
आनंद नाईक यांच्या पत्नी अंगणवाडी शिक्षिका असून त्यांना आंबेऊदक (सावर्डे) येथे कामावर सोडून परतत असता त्यांच्या वाहनाला अपघात झाला.
Sunday, 5 July 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment