नवी दिल्ली, दि. ५ - ईव्हीएममध्ये (इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन) मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याने महाराष्ट्र व हरयाणात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रांचा वापर करू नये. त्याऐवजी मतपत्रिकांवर शिक्के मारून त्या मतपेट्यांमध्ये टाकण्याची जुनीच पद्धत लागू करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
जोपर्यंत ईव्हीएम "फुलप्रूफ' असल्याची खात्री पटत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने मतदान यंत्राचा निवडणुकीत उपयोग करू नये, अशी मागणी भाजपने केली आहे.
ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेऊ नये, अशी मागणी केली आहे. मतदान यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर दोष असून, त्यामध्ये फेरफार करून विशिष्ट पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्यात आल्याचे गैरप्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र व हरयाणात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतपत्रिकांवर शिक्का मारण्याची पद्धत पुन्हा लागू करावी, असे अडवाणी यांनी म्हटले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ईव्हीएम मशीनद्वारे मतदानात गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. अन् सैगल यांनी ईव्हीएम मशीन दोषपूर्ण असल्याचे सिद्ध केल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांनी याप्रकरणी उप-निवडणूक आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती भाजपा प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे.
जर्मनीत ईव्हीएमच्या वापरावर बंदी असून अमेरिकेत ईव्हीएमसोबतच बॅलेट पेपरवरही मतदान करावे लागते, याचाच अर्थ अत्याधुनिक तंत्रज्ञान बाळगणाऱ्या दोन्ही देशांचा ईव्हीएमवर पूर्ण विश्वास नाही. म्हणूनच जगभरातील लोकशाही राष्ट्रे अजूनही जुन्याच पद्धतीचा अवलंब करतात, अशी माहितीही प्रसाद यांनी दिली.
भाजपा नेते एकनाथ खडसे यांनीही अडवाणी यांच्या मागणीचाच पुनरुच्चार केला असून शिवसेनेने मात्र अद्याप यासंदर्भात अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. ईव्हीएम मशीनमधील गैरप्रकाराबाबत शिवसेना नेतृत्वाकडेही काही तक्रारी आल्या आहेत. मात्र योग्यवेळी यासंदर्भातील भूमिका शिवसेना स्पष्ट करेल, अशी प्रतिक्रिया सेनेच्या प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
कॉंग्रेसने मात्र ईव्हीएम मशीन्सच्या माध्यमातून मतदान घ्यावे असा आग्रह धरला आहे. पुन्हा जुनीच पद्धत स्वीकारणे म्हणजे जुन्या काळात जाण्यासारखे आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेला आणि निकाल लागण्यास विलंब होईल. शिवाय निवडणुका घेण्याचा खर्चही वाढेल, असे मत कॉंग्रेस प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले.
आयोगासमोर गैरप्रकार सिद्ध
दिल्लीतील वरिष्ठ सनदी अधिकारी ओमेश सैगल यांनीच ईव्हीएम मशीनमधील गैरप्रकाराची बाब उघडकीस आणली. त्यांनी गैरप्रकार कसे घडवून आणले जातात हे एका उदाहरणासह सिद्ध करून दाखविले. सैगल यांनी यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने त्यांना त्यांचे म्हणणे सिद्ध करण्यास सांगितले. त्यानुसार सैगल यांनी सविस्तर "प्रेझेंटेशन' करून मतदान यंत्रातील दोष दाखवून दिले. यामुळे मतदान यंत्र फुलप्रूफ नसल्याचे निवडणूक आयोगाच्याही लक्षात आले आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन भाजपाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतपत्रिका वापरण्याची मागणी केली आहे.
Monday, 6 July 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment