मडगावातील घटनाः ८० लाखांची हानी
मडगाव, दि. ८ (प्रतिनिधी) - येथील पाजीफोंड भागातील डॉ. ह्यूबर्ट गोम्स यांच्या अत्याधुनिक अशा दंतचिकित्सालयाला आज पहाटे आग लागून ते संपूर्ण खाक झाले व त्यामुळे साधारण ७० ते ८० लाखांचे नुकसान झाले असावे असा अंदाज आहे. आगीचे निश्चित कारण जरी उघड झालेले नसले तरी शॉटसर्किटमुळेच ती लागली असावी, असा अंदाज आहे.
सदर दवाखाना पाजीफोंड येथील ज्योती प्लाझा समोरील रिलायन्स इमारतीच्या तळमजल्यावर आहे. तेथून धूर बाहेर येत असल्याचे पहाटे ४-३० वाजता कोणी तरी पाहिले व अग्निशामक दलाला खबर दिली. त्यांनी लगेच दाखल होऊन ती विझविण्याचे काम सुरू केले, ते तब्बल आठ वाजेपर्यंत चालले. अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एकूण चार बंब ही आग विझविण्यासाठी लागले. त्यांनी ही आग शॉर्ट सर्किटमुळेच लागल्याचा संशय व्यक्त करताना तेथील ए. सी. संपूर्णतः जळाल्याचे सांगितले.
या आगीत दवाखान्यातील सर्व अत्याधुनिक उपकरणे, खुर्च्या , इतर फर्निचर खाक झाले. डॉ.ह्युबर्ट गोम्स हे नामवंत दंतचिकित्सक आहेत व त्यांच्याकडे देशविदेशांतून रुग्ण येत असत व त्यामुळे त्यांनी आपला दवाखानाही त्याच तोडीचा बनविला होता. दांतांची चिकित्सा करताना हवे तशा आकाराचे व नमुन्याचे दांत तयार करून ते बसविण्यात त्यांचा हातखंडा होता.
या आगीत त्यांचा दवाखाना व तयार करून ठेवलेले दांतांच्या कवळ्या भक्ष्यस्थानी पडल्या. या दवाखान्याखेरीज तळमजल्यावर आणखी अनेक दुकाने होती ती आगीपासून वाचविण्याचे काम अग्निशामक दलाने केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
Thursday, 9 July 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment