फोंडा, दि.७ (प्रतिनिधी) : येथील फोंड्याच्या नगराध्यक्षपदी अपेक्षेनुसार गृहमंत्री रवी नाईक यांचे समर्थक असलेले शैलेंद्र जनार्दन शिंक्रे यांची आज (दि.७) सकाळी निवड करण्यात आली.
व्यंकटेश नाईक यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. येथील नवीन नगराध्यक्ष निवडण्यासाठी पालिका मंडळाची मंगळवार ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पालिका सभागृहात खास बैठक घेण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी शैलेंद्र शिंक्रे आणि शिवानंद सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शैलेंद्र शिंक्रे यांना आठ तर शिवानंद सावंत यांना चार मते मिळाली. यावेळी नगरसेविका सौ. राधिका नाईक अनुपस्थित होत्या.
शैलेंद्र शिंक्रे यांच्याबाजूने सौ.दीक्षा नाईक, प्रदीप नाईक, सुभाष मुंडये, व्हिसेन्ट पॉल फर्नांडिस, दामोदर नाईक, संजय नाईक, किशोर नाईक यांनी मतदान केले. तर शिवानंद सावंत यांच्या बाजूने सौ. रूक्मी डांगी, ऍड. वंदना जोग, व्यंकटेश नाईक यांनी मतदान केले. सध्या सत्ताधारी गटातील नगरसेवकांची संख्या आठ झाली आहे. सुभाष मुंडये आणि व्हिसेन्ट फर्नांडिस यांनी शैलेंद्र शिंक्रे यांच्या बाजूने मतदान करून सत्ताधारी गटात प्रवेश केला आहे. पूर्वी हे दोघेही व्यंकटेश नाईक यांच्या बाजूने होते. निर्वाचन अधिकारी म्हणून म्हापसा येथील उपजिल्हाधिकारी श्री. खोजुर्वेकर यांनी काम पाहिले. यावेळी फोंडा पालिकेचे मुख्याधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जयंत तारी उपस्थित होते.
गृहमंत्री रवी नाईक यांच्या सहकार्याने पालिका क्षेत्रात विकास कामे राबवून पालिका क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे नूतन नगराध्यक्ष शिंक्रे यांनी सांगितले. कचरा, मार्केट प्रकल्प यांना प्राधान्य दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिंक्रे यांनी नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजीव गांधी कला मंदिरात गृहमंत्री रवी नाईक यांची भेट घेतली. यावेळी मंत्री श्री. नाईक यांनी श्री. शिंक्रे यांचे अभिनंदन केले.
उपनगराध्यक्षांचा राजीनामा
येथील पालिकेच्या उपनगराध्यक्ष ऍड. वंदना जोग यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा आज दुपारी दिला. फोंडा पालिकेत भाजप समर्थक नगरसेवकांचा गट सत्तेवर आल्यानंतर गेल्या १६ एप्रिल ०९ रोजी ऍड. वंदना नारायण जोग यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. ह्या गटात गेल्या जून महिन्यात मतभेद झाल्याने व्यंकटेश नाईक यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पालिकेची सत्ता पुन्हा कॉंग्रेस समर्थकांच्या हातात आल्याने तसेच नवीन नगराध्यक्षांची निवड झाल्यानंतर उपनगराध्यक्ष ऍड. जोग यांनी सन्मानपूर्वक आपल्या पदाचा राजीनामा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
Wednesday, 8 July 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment