Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 5 July 2009

त्या युवतीच्या खुनाचे गूढ अद्यापही कायम

पेडणे, दि. ४ (प्रतिनिधी)- हरमल गिरकरवाडा दांडे येथे एका झोपडीत काल ३ जुलै रोजी रात्री उशिरा ज्या वीस वर्षीय युवतीचा खून झाला त्याविषयीचे धागेदोरे मिळालेले नाहीत. संबंधित युवतीच्या उजव्या मनगटावर इंग्रजी अक्षर "एस' व देवनागरीत "विता' ही दोन अक्षरे कोरण्यात आली आहेत.
धारदार शस्त्राने गळा कापला गेल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले आहे. तिच्यावर बलात्कार झाला की नाही याचा अहवाल मात्र राखून ठेवण्यात आला आहे. या खून प्रकरणातील संशयित आरोपी अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन नार्वेकर, हवालदार लाडजी नाईक, तपास करीत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार सदर युवती व दोघे युवक हरमल येथील एका रेस्टॉरंटमध्ये काल रात्री जेवणासाठी आले होते. त्यांना मराठी व हिंदी अशा दोन भाषा अवगत होत्या. ती युवती व युवक महाराष्ट्रीय असावी, असा पोलिसांचा कयास आहे.
दांडे हरमल समुद्रकिनारी पर्यटक हंगामात पर्यटकांसाठी "हट्स' उभारले जातात. ते पावसाळ्यात हटवणे बंधनकारक आहे. मात्र, संबंधित शॅक्स व्यावसायिकांनी ते हट्स तसेच ठेवले होते. त्या हट्सचा वापर त्या दोन युवक व युवती यांनी आसऱ्यासाठी केला. त्या परिसरात कोणी नसल्याची संधी साधून या युवतीला आतमध्ये नेऊन दोघा युवकांनी तिच्यावर बळजबरी केली असावी, अशी शक्यता असून त्यावेळी झालेल्या बाचाबाचीतून तिचा खून झाला असावा, असा कयास व्यक्त होत आहे.
त्या मुलीने तांबडा टॉप व निळी जीन्स परिधान केली होती. तिच्या अंगावर तेव्हा दागिने नव्हते किंवा पर्सही सापडली नाही.
घटना घडली त्या रात्री पेडणे पोलिसांनी सर्व चेकनाक्यांवर बिनतारी संदेश पाठवून नाकाबंदी केली होती. पेडणे पत्रादेवी चेकनाका, चोपडे जंक्शन व केरी तेरेखोल या भागातून संशयित पळून जाऊ नयेत म्हणून नाकाबंदी व वाहनांची कडक तपासणी केली जात होती. त्याचप्रमाणे अन्य हॉटेलांत संशयित आरोपी राहिले काय, याचीही तपासणी पोलिसांनी केली. लवकरच आरोपींना गजाआड केले जाईल, असा विश्वास पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी व्यक्त केला आहे.

No comments: