पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): राज्यात सर्वत्र धोधो पाऊस पडत असताना पर्वरीवासियांच्या घरातील नळ मात्र साफ कोरडे पडले आहेत. पर्वरी येथील बहुतेक भागांत गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे पाणी विभाग व वीज खाते यांच्यात याप्रकरणावरून सध्या बराच वाद सुरू आहे. दोन्ही खात्यांकडून एकमेकांवर आरोप करण्यात येत असल्याने पर्वरीवासीय मात्र पावसात पाण्यासाठी वणवण भटकत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार पर्वरी व बार्देश तालुक्यातील इतर काही भागांत मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मुख्य पाण्याची टाकी असलेल्या पर्वरी भागांत वारंवार वीज खंडीत होण्याचा प्रकार होत असल्यानेच ही परिस्थिती उद्भवली असल्याची भूमिका सा.बां.खात्याच्या पाणी विभागाने घेतली आहे. पावसामुळे विजेची ही अशी परिस्थिती निर्माण होणारच,असे सांगून वीज खातेही आपली जबाबदारी झटकत असल्याने त्यात सामान्य नागरिक मात्र भरडले जात आहेत. गेले तीन दिवस येथील नागरिकांनी सा.बां.खात्याच्या पाणी विभागाला तक्रारी व फोन करून सतावल्याने त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी जाहिरातच प्रसिद्ध केल्याचीही खबर आहे. वीज खंडीत होत असल्यामुळेच बार्देश तालुक्यातील अनेक भागांत मर्यादित पाणी पुरवठा होईल,असे सांगून जोपर्यंत वीज खाते यावर तोडगा काढणार नाहीत तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील,असेही या जाहिरातीत प्रसिद्ध केले आहे. मुळात याबाबत दोन्ही खात्याच्या अधिकाऱ्यांनी सामंजस्याने तोडगा काढून हा विषय निकालात काढण्याची गरज होती परंतु तसे न करता या दोन्ही खात्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असल्याने त्याचे परिणाम मात्र नागरिकांना भोगावे लागत असल्याची तक्रार आहे.
Wednesday, 8 July 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment