पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - जिल्हा पंचायत व ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी दोन रिक्त जागांसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक घेण्याची घोेषणा राज्य निवडणूक आयुक्त पी.एम.बोरकर यांनी केली आहे. ताळगाव व सांताक्रुझ हे दोन जिल्हा पंचायत मतदारसंघ व करमळी व पिळगाव ग्रामपंचायतीच्या दोन प्रभागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.
ताळगावची जागा माजी जिल्हा पंचायत अध्यक्षा जेनिफर मोन्सेरात यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली होती. ही जागा महिलांसाठी राखीव आहे तर सांताक्रुझ जिल्हा पंचायतीचे सदस्य लोरेन्स आझावेदो यांचे निधन झाल्याने ही जागा रिकामी झाली आहे. करमळी ग्रामपंचायतीच्या प्रभाग ५ (अनुसूचित जमातीसाठी राखीव) व डिचोली तालुक्यातील पिळगांव पंचायतीच्या प्रभाग ३ चे पंच अजय गांवकर यांनी राजीनामा दिल्याने या प्रभागासाठीही पोटनिवडणूक होईल.
या पोटनिवडणुकीसाठी १३ ते २० जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होईल. २१ रोजी अर्जांची छाननी, २२ रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख तर त्याच दिवशी अंतिम यादी जाहीर होईल. ९ ऑगस्ट रोजी या दोन जिल्हा पंचायत मतदारसंघ व दोन पंचायत प्रभागांसाठी प्रत्यक्ष मतदान होईल व १० रोजी मतमोजणी होईल.
करमळी व पिळगाव पंचायत पोटनिवडणुकीसाठी तिसवाडी व डिचोली तालुक्याचे मामलेदार निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील तर जिल्हा पंचायतीचे दोन्ही मतदारसंघ तिसवाडी तालुक्यात येत असल्याने तिसवाडीचे उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी निवडणूक अधिकारी असतील,अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Friday, 10 July 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment