Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 8 July 2009

बनावट चकमकप्रकरणी पोलिसांवर खुनाचा गुन्हा उत्तराखंड सरकारची कारवाई

डेहराडून, दि. ७ : 'एमबीए'ची पदवी घेतलेल्या एका सुशिक्षित तरुणाला बनावट चकमकीत ठार मारणाऱ्या पोलिसांविरुद्ध कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रणबीर सिंग या तरुणाबाबत ही दुर्दैवी घटना घडली. या बनावट चकमकीशी संबंधित सर्व पोलिसांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यामध्ये पोलिस उपअधीक्षक अजय कुमार आणि जी. सी. तमटा यांचाही समावेश आहे. मृत तरुणाचे वडील रवींद्र पाल सिंग यांच्या तक्रारीनंतर कथित दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात आली.
गेल्या शुक्रवारी या २२ वर्षीय तरुणाला चकमकीत ठार करण्यात आले होते. या प्रकरणानंतर राज्यात पोलिसांविरुद्ध प्रचंड असंतोष उफाळला आहे. दोषींविरुद्ध कारवाई व्हावी, या मागणीसाठी लोकांनी आंदोलनही केले. अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. एवढेच नव्हे, तर त्यापूर्वी त्याला बेदम मारहाणही करण्यात आली होती, अशी माहिती शवविच्छेदन अहवालात पुढे आली. या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची सरकारची तयारी आहे, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारतर्फे तशी शिफारस केंद्र सरकारकडे केली जाणार असल्याचेही पोखरीयाल यांनी सांगितले.

No comments: