Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 10 July 2009

मडगाव रेल्वे स्टेशनला मिळणार जागतिक दर्जा

श्रीपाद नाईक यांची मागणी मान्य

मडगाव, दि. ९ (प्रतिनिधी) - उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी रेल्वे अंदाजपत्रकावरील चर्चेत भाग घेताना मडगाव रेल्वे स्टेशनचा समावेश जागतिक दर्जाच्या (वर्ल्ड क्लास) सोयीसुविधा निर्माण करण्यात येणाऱ्या देशातील ५० रेल्वे स्टेशनांत करावा, अशी जोरदार मागणी लोकसभेत केली होती, ती रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मान्य केल्याने गोवा प्रदेश भाजपने स्वागत केले आहे. मडगाव रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढविण्याच्या या घोषणेचे गोव्यात व्यापक स्वरुपात स्वागत झालेले आहे.
यादीत ४६ शहरांची भर
आज लोकसभेत रेल्वे बजेटवरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. त्या म्हणाल्या की, यापूर्वी रेल्वे अंदाजपत्रकात ज्या स्थानकांना जागतिक स्तराचा दर्जा मिळवून देण्याची योजना सुचविण्यात आली होती त्या यादीत गोवा आणि कालिकत यांचाही समावेश करण्यात आला आहे. आदर्श स्थानकांच्या यादीतही अतिरिक्त ४६ शहरांची नावे आता समाविष्ट केली जाणार आहेत. याशिवाय महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, दिल्ली ते सिकंदराबाद आणि दिल्ली ते नागपूर दरम्यान दोन नॉन स्टॉप दूरांत गाड्या सुरू होणार आहेत. या गाड्या एक महिन्याच्या आत सुरू होणार असल्याचेही बॅनर्जी यांनी सांगितले.
यापूर्वी त्यांनी आपल्या बजेटच्या भाषणात ५० स्थानकांना वर्ल्ड क्लास दर्जा देण्याचे जाहीर केले होते. आदर्श स्थानकांच्या यादीत सासाराम आणि नौगछियासह एकूण ४६ स्थानके समाविष्ट होणार आहेत. सोबतच बहुउद्देशीय परिसरांच्या रुपात विकसित केल्या जाणाऱ्या स्थानकांच्या यादीत दुर्गापूर, वर्धमान आणि अयोध्येसह १५ स्थानकांना समाविष्ट करण्यात आले आहे. रेल्वे अंदाजपत्रकात १२ दूरांत गाड्यांची घोषणा करण्यात आली होती. आता त्यात आणखी दोन गाड्यांची भर पडली आहे.
ममता बॅनर्जी यांच्या घोषणेमुळे कोकण रेल्वेमार्गावरील महत्वाचे जंक्शन ठरलेल्या मडगाव स्टेशनाला आता आणखीन महत्व येणार असल्याचे सांगितले जात आहे. गोव्यातून पर्यटन व्यवसायातून केंद्राला जी हजारो कोटींचे विदेशी चलन मिळते ते पहाता असा दर्जा मिळणे हा मडगावचा अधिकार होता, असे श्रीपाद नाईक यांनी म्हटले होते. आपली मागणी मान्य केल्याबद्दल नाईक यांनी सरकारचे आभार मानले आहेत. करमळीला "मॉडेल' स्टेशनचा दर्जा देण्याची आपली मागणी मान्य करण्याचे आवाहन त्यांनी ममता बॅनर्जी यांना केले आहे.
रेल्वे मंत्र्यांनी आज एक प्रकारे श्रीपादभाऊंची मागणी मान्य करताना रेल्वे अर्थसंकल्प सादर करतेवेळी झालेली आपली चूकच सुधारली आहे. या दर्जामुळे केवळ तिकिट आरक्षणातच केवळ नव्हे तर सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांचा लाभ या स्टेशनला मिळणार आहे. रेल्वेने यापूर्वीच सर्वसामान्य प्रवासी व आपले कर्मचारी यांच्यासाठी यात्री निवास तसेच विश्रामधाम बॉंधण्याचे काम सुरु केले आहे. रेल्वे स्टेशनवरील सुरक्षेलाही प्राधान्य देताना येथे सीसीटीव्ही बसविण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आह्े.
जागतिक दर्जामुळे स्टेशनवरील सर्व सुविधा त्या दर्जाच्या होण्याबरोबरच आणखी सुविधांची त्यात भर पडेल तसेच स्टेशनला जोडणारे नवे मार्ग तयार होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी रेल्वेमंत्र्यांच्या यासंबंधीच्या घोषणेचे स्वागत केले आहे.

No comments: