Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 11 July 2009

अंजुणे धरणात मुबलक पाणी अभियंत्याचा दावा

पाळी, दि. १० (वार्ताहर ): अंजुणे धरणातील पाण्याची पातळी कमी असल्यासंबंधीचे वृत्त प्रकाशित झाले असून नागरिकांनी त्यामुळे घाबरण्याचे मुळीच कारण नाही, उर्वरित काळात आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असल्याने पाण्याची समस्या उद्भवण्याचा प्रश्नच येत नाही, असे मत अंजुणे धरण प्रकल्पाचे साहाय्यक अभियंते एम. पी. हूड्डेगुड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. या विषयी सविस्तर माहिती देताना एम.पी हूड्डेगुड्डी यांनी सांगितले की ४४८३ हेक्टर मीटर क्षमतेच्या अंजुणे धरणात १३०० हेक्टर पाणी भरले आहे. सुरुवातीच्या काळातील पावसानंतर सध्या जमीन चार्ज झाल्याने पाणी तीव्र गतीने भरत आहे. यंदा या भागात एकूण १६६२.८मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आणखी २९००मि.मी. पाऊस झाल्यास धरणात मुबलक प्रमाणास पाणी जमा होणार आहे. पावसाचा कालावधी अजून बाकी आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नसल्याचे हुड्डेगड्डी यांनी सांगितले. गेल्या दहा दिवसांत या भागात चांगला पाऊस पडल्याने पाण्याची पातळी वाढत आहे ऐरवी अंजुणे धरणातील पाणी आम्ही जास्त पाऊस असल्याने सोडत नाही. ओहोटीच्या वेळीच पाणी सोडले जाते. प्रतिवर्षी १ जूनपर्यंत आम्ही पाणीपुरवठा बंद करायचो, यंदा मात्र २६ जून पर्यंत पुरवठा चालू ठेवला होता. धरणातील पाणी आवक पातळी गाठल्यानंतर धरणाचा पहिला दरवाजा ९१ उंची पर्यंत ओलांडल्यानंतर १५ ऑगस्टनंतर उघडला जातो. हुड्डेगुड्डी यांनी पुढे सांगितले की अंजुणे धरण अद्ययावत सुविधांनी युक्त बनविण्यात येत आहे. मॅकाट्रॉनिक्स या पुढे येथील कंपनीने खास संगणकीय अत्याधुनिक यंत्रे केरी सत्तरी येथे बसविली आहेत. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन दर दिवशी पडणारा पाऊस, धरणातील पाण्याची पातळी आदी गोष्टीची नोंद ठेवण्यास सहकार्य मिळत आहे. बसल्या ठिकाणावरून सर्व गोष्टींवर निमंत्रण ठेवणे शक्य आहे. सुरुवातीच्या काळात धिम्या गतीने पडणारा पाऊस गेल्या दहा दिवसांपासून चांगला पडत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे.अंजुणे धरणात मुबलक प्रमाण पाणी साठले जाईल त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याचा प्रश्नच येत नाही. नागरिकांना पिण्याचे पाणी दरवर्षी प्रमाणे यंदाही उपलब्ध होणार आहे,असे मत ए.पी. हुड्डेगुड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

No comments: