Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 4 July 2009

पावसाचा जोर सुरूच


दक्षिण गोव्यात जनजीवन विस्कळीत

वास्कोत घर कोसळले
सासष्टीत रस्ते वाहून गेले
फोंड्यात झाडांची पडझड


पणजी, वास्को, मडगाव व फोंडा दि. ३ (प्रतिनिधी)ः गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसाने आज सकाळपासून उग्र रूप धारण करताना दक्षिण गोव्याला जोरदार तडाखा दिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. ड्रायव्हर हिल-वास्को येथे घराची संरक्षण भिंत कोसळल्याने एकूण तीन घरांची नुकसानी झाली तर मडगाव व फोंडा येथे मोठ्या प्रमाणात पडझड, नवीन रस्ते वाहून गेल्याने वाहतुकीस व्यत्यय आला. राज्यात गेल्या २४ तासांत सुमारे ८४ मिमी पावसाची नोंद झाली. अग्निशामक दलाच्या मुख्य कार्यालयात एकूण २७ संदेशांची नोंद झाली.
काल सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुरगाव तालुक्यातील वेगवेगळ्या घटनांमध्ये आज तीन घरांना नुकसानी झाल्याची माहिती वास्को अग्निशामक दलाचे प्रमुख बॉस्को फेर्रांव यांनी दिली. आज संध्याकाळी सात वाजण्याचा सुमारास ड्रायव्हर हिल येथील उतारावर असलेल्या दिलीप पार्सेकर यांच्या घरावर वरच्या बाजूने असलेल्या नरेश शिरोडकर यांच्या घराची संरक्षण भिंत मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कोसळली. यामुळे त्यांच्या घराची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. पार्सेकर यांच्या घराचे छप्पर तसेच दोन खोल्या पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याची माहिती बॉस्को फेर्रांव यांनी देताना पन्नास हजाराच्या आसपास नुकसान झाल्याचे ते म्हणाले. घटनेवेळी घरात कोणीही उपस्थित नसल्याचे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या घटनेमुळे घराला आणखीन धोका असल्याचे गृहीत धरून घरातील सहा सदस्यांना येथून हालवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज सकाळी वास्को, गोवा शिपयार्ड समोर असलेले एक मोठा माड कोसळून ते जोनेता फर्नांडिस यांच्या घरावर पडल्याने त्यांच्या घराची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. वेलसांव येथे अन्य एका घरावर झाड कोसळल्याने नुकसान झाले. याचप्रमाणे बोगमाळो येथे माड वीज वाहिन्यांवर कोसळल्याने धोका निर्माण झाला होता. दाबोळी येथील महामार्गावर ऑईल रस्त्यावर पडल्याने धोका निर्माण झाला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेऊन रस्ता वाहनांना सुरक्षित करून दिला.
काल रात्री वेळ्ळी - कायरावाडो येथील आगासिना कायरो यांच्या घरावर माड पडून अंदाजे दहा हजारांचे नुकसान झाले तर आज सकाळी माजोर्डा येथे विपीन मेंडिस यांच्या घरावर झाड पडले मात्र नुकसानाची आकडेवारी अद्याप स्पष्ट झाली नाही. नागमोडे नावेली येथे लुईझा रिबेलो यांच्या घरावर झाड पडून घराचा कोपरा मोडल्याने सुमारे पाच हजारांचे नुकसान झाले.
मोतीडोंगर, घोगळ, आगाळी, माडेल येथे रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. येथील अग्निशामक दलाचे जवान कालपासून अशाप्रकारे पडलेली झाडे बाजूला काढण्यात व्यस्त आहेत. ग्रामीण भागात पावसामुळे झाडे वीज तारांवर पडून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज खात्याचे कर्मचारी कार्यरत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळाले.
मडगावात नव्याने तयार करण्यात आलेला आर्लेम-राय रस्ता तसेच विद्यानगर-बोर्डा जंक्शनपर्यंतचा रस्ता जोरदार पावसाने वाहून गेला. पेडा येथील भुयारी मार्गांत पाणी भरल्याने तेथील वाहतूक ठप्प झाली. दिवसभर सुरू असलेल्या संततधारेमुळे आज एकंदर बाजारावरही परिणाम झालेला दिसून आला.
दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे फोंडा तालुक्यातील विविध भागात झाडांची पडझड सुरू झाली असून कुर्टी, धोणशी आणि पेडे शिरोडा येथे घरावर झाडे पडण्याच्या घटना घडल्या. शिरोडा येथे एक सहा वर्षाची मुलगी सुदैवाने बचावली.
शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारे पेडे शिरोडा येथे सूर्यकांत नाईक यांच्या घरावर झाड मोडून पडल्याने सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी घरात असलेली सहा वर्षाची साक्षी नाईक ही मुलगी सुदैवाने बचावली. घरावर झाड पडल्याने तिच्या जवळच घराची कौले पडली.
मेस्तवाडा कुर्टी येथील अरुण चोडणकर यांच्या घरावर झाड मोडून पडल्याने अंदाजे पाच हजार रुपयांची हानी झाली. धोणशी नागेशी येथील रोहिदास बांदोडकर यांच्या घरावर झाड मोडून पडल्याने सुमारे पाच हजार रुपयांची हानी झाली.
कुंडई येथे हॉटेल वैशालीजवळील रस्त्यावर आज सकाळी एक झाड मोडून पडल्याने वाहतुकीत काही काळ व्यत्यय आला. फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी त्या ठिकाणी धाव घेऊन रस्त्यावर पडलेले झाड दूर करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला. मडकई, निरंकाल येथील श्री महादेव देवालयाजवळ रस्त्यावर पडलेले झाड अग्निशामक दलाच्या जवानांनी हटविले. दरडी कोसळण्याचा लहान मोठ्या घटना घडल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना बरीच धावपळ करावी लागली. येथील अग्निशामक दलाचे उपअधिकारी दिलीप गावस, शैलेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ जवान एन. डी. बोरकर, एस. डी. गावकर, टी. एस. वेर्णेकर, जी. एस. नाईक, एम. एम. डिकॉस्ता, पी. टी. सांगोडकर, डी. जी. गावस, वाय. एम. परब, एम. एम. नाईक यांनी झाडे हटविण्याचे काम केले.

No comments: